अनंत अंबानींचे वचन पूर्ण; रिलायन्स फाउंडेशनकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस

 अनंत अंबानींचे वचन पूर्ण; रिलायन्स फाउंडेशनकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस



• भाविकांचा प्रवास होणार अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक

• ब्रह्मोत्सवाच्या काळात नव्या बस दाखल; स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही सज्ज


तिरुमला, १६ सिटी न्यूज नेटवर्क 

 तिरुमलाला येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशनने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे २५ इलेक्ट्रिक बस सुपूर्द केल्या आहेत. या बससाठी स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या बसांना हिरवा झेंडा दाखवला.



नव्या इलेक्ट्रिक बसांमुळे दरवर्षी तिरुमलाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल. तिरुमलामध्ये ब्रह्मोत्सवाचा उत्सव सुरू असून, यावेळी मोठ्या संख्येने भाविक तिरुमलाला येत असताना या बस सुपूर्द करण्यात आल्या आहेत.


रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जून २०२६ मध्ये तिरुमला दौऱ्यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस देण्याचे वचन दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत रिलायन्स फाउंडेशनने हे वचन पूर्ण केले आहे. या बससाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी Jio-bp ने तांत्रिक सहकार्य केले आहे.


अनंत अंबानी म्हणाले, “दरवर्षी लाखो भाविक भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तिरुमलाला येतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी योगदान देणे हे आमच्यासाठी सौभाग्य आणि जबाबदारी दोन्ही आहे. या २५ इलेक्ट्रिक बस तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रयत्नांना आमचे छोटेसे योगदान आहे. तिरुमलेश्वराच्या तीर्थयात्रेचा अनुभव अधिक आरामदायी करण्यासोबतच या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे, हा यामागचा उद्देश आहे.”

Comments