गोकुळ निवडणुकीत कोण मारणार बाजी? उमेदवारी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात

 

"गोकुळ' निवडणुकीत कोण मारणार बाजी? उमेदवारी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात




उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला सुरुवात; २५ संचालकांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग

कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क 


कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होत आहे. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून, रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत गोकुळच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.


गोकुळच्या निवडणुकीतून एकूण २५ संचालकांची निवड होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, कोणत्या गटातून कोणाला उमेदवारी मिळणार, कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद आहे आणि कोणत्या नेत्याची राजकीय खेळी निर्णायक ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी इच्छुकांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज व संबंधित कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना  महायुतीच्या नेत्यांनी केल्याची माहिती सूत्राकडून समजली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या टप्प्यापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

विशेष म्हणजे, गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांसोबतच राज्यातील सत्ताकारणाचाही प्रभाव पडणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होताच इच्छुकांची संख्या, प्रमुख राजकीय गटांची भूमिका आणि संभाव्य उमेदवारांची नावे स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गोकुळच्या २५ जागांसाठी कोणता गट बाजी मारणार आणि कोणाची राजकीय ताकद निर्णायक ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


Comments