अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा २५ लाखांचा निधी विनाकारण नाकारला: शिंगणापूर ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस

 अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा २५ लाखांचा निधी विनाकारण नाकारला: शिंगणापूर ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस



सात दिवसांत खुलासा न दिल्यास कारवाईचा इशारा

कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क 


अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी मंजूर झालेला तब्बल २५ लाख रुपयांचा निधी वापरण्यास शिंगणापूर ग्रामपंचायतीने विरोध केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सन २०२५-२६ मध्ये काँक्रीट रस्त्यांसाठी निधी मंजूर करून प्रशासकीय आदेशही काढले असताना, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या निधीला बहुमताने विरोध करण्यात आला. या विरोधाचे ठोस कारण मात्र ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.



या प्रकाराची गंभीर दखल घेत करवीर गटविकास अधिकाऱ्यांनी शिंगणापूर ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. समाधानकारक खुलासा न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


२५ लाखांचा निधी मंजूर, तरी काम रखडले


शिंगणापूर गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील काँक्रीट रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत प्रशासकीय आदेशही निघाले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र, निधी उपलब्ध असूनही काम पुढे सरकले नाही.


१२ सदस्यांचा निधीला विरोध


ग्रामपंचायतीच्या १६ मार्च रोजी झालेल्या मासिक सभेत १७ पैकी १२ सदस्यांनी या मंजूर निधीचा वापर करण्यास विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर केला. विशेष म्हणजे या ठरावात निधीला विरोध करण्यामागचे ठोस कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.


त्याहून गंभीर बाब म्हणजे विरोध करणाऱ्या १२ सदस्यांमध्ये पाच सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीसाठी शासनाने मंजूर केलेला निधी नेमका कोणत्या कारणासाठी रोखण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे.


बीडीओंच्या सूचनांकडेही दुर्लक्ष?


निधी मंजूर झाल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याच्या सूचना करवीर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही ग्रामपंचायतीतील संबंधित सदस्यांनी निधी वापरण्याचा विरोध कायम ठेवल्याचे सांगण्यात येते.


ग्रामसभेतही निधी वापरण्यास नकार


हा विषय पुढे ग्रामसभेतही उपस्थित करण्यात आला. मात्र, विरोध करणारे सदस्य तसेच त्यांचे नेते अमर पाटील यांनी निधी वापरण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मंजूर निधी असूनही अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील रस्त्यांचे काम रखडल्याचा आरोप होत आहे.


वंचित, भाजपचा आंदोलनाचा इशारा


या प्रकाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही संघटनांनी करवीर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित प्रकाराची चौकशी करून मंजूर निधीतून तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


शासनाने एका विशिष्ट वस्तीच्या मूलभूत सुविधांसाठी मंजूर केलेला निधी ग्रामपंचायतीला मनमानी पद्धतीने नाकारता येतो का? निधीला विरोध करण्यामागचे नेमके कारण काय? आणि सर्व प्रक्रिया पूर्ण असताना नागरिकांना विकासकामांपासून वंचित का ठेवले जात आहे? या प्रश्नांची उत्तरे आता ग्रामपंचायतीला प्रशासनासमोर द्यावी लागणार आहेत.


सात दिवसांच्या मुदतीत ग्रामपंचायतीकडून काय खुलासा होतो आणि प्रशासन त्यावर कोणती कारवाई करते, याकडे शिंगणापूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Comments