रंकाळ्यात नौकांची थरारक झुंज; सांगलीवाडीच्या तरुण मराठा क्लबने मारली बाजी

 रंकाळ्यात नौकांची थरारक झुंज; सांगलीवाडीच्या तरुण मराठा क्लबने मारली बाजी



कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे गट नेते मा. श्री. शारंगधर वसंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रंकाळा तलावावर ‘रंकाळा वैभव शारंग नौका चषक’ भव्य होड्यांच्या गती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रदीर्घ कालावधीनंतर रंकाळा तलावावर अशा प्रकारची भव्य नौकांची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने करवीरवासीयांमध्ये या स्पर्धेबद्दल मोठे आकर्षण निर्माण झाले होते. नौकांच्या वेगाचा थरार अनुभवण्यासाठी रंकाळ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.



स्पर्धेत विविध बोट क्लबच्या संघांनी सहभाग घेतला. चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत तरुण मराठा बोट क्लब, सांगलीवाडी संघाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा चषक आणि ३५ हजार रुपये रोख पारितोषिक मिळविले. लक्ष्मीनारायण बोट क्लब, इचलकरंजी संघाने द्वितीय क्रमांक मिळवत २५ हजार रुपये, मोरया बोट क्लबने तृतीय क्रमांक मिळवत १७ हजार रुपये, तर डिग्रज बोट क्लबने चतुर्थ क्रमांक पटकावत ११ हजार रुपये व चषक मिळविला.



नौकांच्या वेगवान झुंजीदरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत खेळाडूंचा उत्साह वाढविला. स्पर्धेतील प्रत्येक फेरीत रंगलेली चुरस आणि अंतिम फेरीतील थरारामुळे रंकाळा परिसर जल्लोषाने दुमदुमून गेला.


बक्षीस वितरण समारंभ उपमहापौर अक्षय जरग शुभहस्ते झाला. यावेळी नगरसेविका सौ. कौसर बागवान, अनुराधा खेडकर, शिला सोनुले तसेच नगरसेवक अभी खतकर, अजय इंगवले , रत्नेश शिरोळकर , सामजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान , सूरज देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


स्पर्धेचे संयोजन दीपक बराले यांनी केले. शारंगधर वसंतराव देशमुख वाढदिवस गौरव समिती, संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती, श्रीमहाराज कमिटी, एकजूट तरुण मंडळ, राधेय न्यू स्टार बोर्ड यांच्यासह विविध संस्था व कार्यकर्त्यांचे आयोजनासाठी सहकार्य लाभले.

Comments