मातृदेवता अर्थात पहिली देवता ! 🌺
शारदीय नवरात्रोत्सव – पहिली माळ..आई
कवी उध्दव कानडे म्हणत,
माझी आई फुलाची,अन् फुलांमधल्या वासाची,फुलामधल्या वासाची,अन् पोटामधल्या घासाची...
आई म्हणजे सगळं काही, दुःखात दिलासा देणारी, संकटात आशा देणारी आणि कमकुवतपणाला बळ देणारी,ती प्रेम,माया, वात्सल्य,दया,सहवेदना आणि क्षमाशीलतेचा मूळ स्त्रोत आहे असं खलिल जिब्रानने म्हटले आहे आणि ते योग्यच आहे.नाही का..?
“देव शोधायला मंदिरात जाण्यापूर्वी, एकदा आपल्या आईच्या डोळ्यांत डोकावून पाहा; तिथेच प्रेम, त्याग, माया आणि ममतेच्या रूपात देवत्व अनुभवायला मिळेल!”
शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा हा उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, श्रद्धेचा सन्मान आणि मातृत्वाच्या महात्म्याचे स्मरण! नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या निमित्ताने मनात सर्वप्रथम विचार येतो तो ‘मातृदेवतेचा!’ कारण आपल्या आयुष्यातील पहिली देवता, पहिली गुरू, पहिली मैत्रीण आणि पहिली मार्गदर्शक म्हणजे आपली आई!
आई… हा केवळ दोन अक्षरांचा शब्द नाही; तर त्यात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. तिच्या कुशीत सुरक्षिततेची जाणीव असते, तिच्या स्पर्शात मायेची ऊब असते, तिच्या शब्दांत संस्कार असतात आणि तिच्या आशीर्वादात जगण्याचे बळ असते. लेकराने जग पाहण्यापूर्वी आत्याला आपल्या हृदयात जपते. लेकराला बोलता येण्यापूर्वी त्याची भाषा समजून घेते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून आयुष्यभर त्याच्या पाठीशी उभी राहते.
आई म्हणजे त्यागाचा महासागर आणि प्रेमाचा अथांग सागर!
मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे म्हणून स्वतःच्या दुःखावर हसण्याचे पांघरूण घालणारी, मुलांच्या स्वप्नांना पंख मिळावेत म्हणून स्वतःच्या इच्छांना मुरड घालणारी आणि मुलांच्या यशात स्वतःचे संपूर्ण आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद अनुभवणारी व्यक्ती म्हणजे आई!
मुलाला यश मिळाले की तिचे डोळे आनंदाने भरून येतात; मुलाला अपयश आले की त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ ती देते. जगाने नाकारले तरी आईचा विश्वास संपत नाही. संपूर्ण जग पाठ फिरवेल, पण आईचे मन मात्र आपल्या लेकरासाठी सदैव उघडे असते. म्हणूनच आई ही केवळ जन्म देणारी व्यक्ती नसून जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे.
आपल्या संस्कृतीत मातेला देवतेचे स्थान दिले आहे. ‘मातृदेवो भव’ हा उपनिषदांमधील संदेश केवळ उच्चारण्यासाठी नाही, तर आचरणात आणण्यासाठी आहे. आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगताना आपल्या संस्कृतीने तिच्या त्यागाची, सहनशीलतेची आणि प्रेमाची महती अधोरेखित केली आहे.
नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा करतो. मंदिरात जाऊन आरती करतो, फुले अर्पण करतो आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतो. पण या उपासनेबरोबरच आपल्या घरातील आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, तिच्या श्रमांची जाणीव ठेवणे, तिच्या भावना समजून घेणे आणि तिला सन्मानाने वागविणे हीदेखील खरी देवीपूजाच नाही का?
देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना घरातील आईच्या कष्टांकडे दुर्लक्ष होऊ नये. तिच्या हातचे जेवण प्रेमाने खावे, तिच्याशी चार प्रेमाचे शब्द बोलावेत, तिच्या तब्येतीची विचारपूस करावी आणि तिला आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती असल्याची जाणीव करून द्यावी. कारण देवळातील देवतेची पूजा काही क्षणांची असते; पण मातृदेवतेचा सन्मान प्रत्येक दिवसाचा संस्कार असायला हवा.
कवी ना धों महानोर म्हणत,
पीठ जळे जात्यातून,तसे पाणी डोळ्यांतून,आई करपले हात तुझे भाकरी भाजून,
शिळ्या भाकरीनं केला माझ्या संसाराचा जीव, तुझ्या शब्दांच्या ओवीनं मला केलं चिरंजीव..
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण यश, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावत आहोत. मात्र, या प्रवासात आपल्यासाठी आयुष्यभर धावणाऱ्या आईला वेळ देणे विसरत तर नाही ना? तिच्या हाताला हात लावून तिच्या मनातील भावना ऐकणे, तिच्या चेहऱ्यावरील थकवा ओळखणे आणि तिच्या डोळ्यांतील समाधान जपणे, यासाठी फार मोठ्या संपत्तीची गरज नसते; गरज असते ती केवळ प्रेमाची आणि संवेदनशील मनाची!
आई हयात असताना तिच्या प्रेमाचा सन्मान करूया. तिच्या त्यागाची जाणीव ठेवूया. आणि ती आपल्यासोबत नसली, तरी तिने दिलेले संस्कार, शिकवण आणि प्रेम आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. कारण आई शरीराने दूर गेली तरी तिचे संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वातून आयुष्यभर बोलत राहतात.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया—देवीची भक्ती करताना स्त्रीचा सन्मान करू, आईच्या कष्टांची जाणीव ठेवू आणि मातृत्वातील देवत्व ओळखू!
कारण आई ही केवळ आपल्या घराची लक्ष्मी नसते; ती घराचा आत्मा, कुटुंबाचा आधार आणि संस्कारांची विद्यापीठ असते.
आईच्या चरणी कृतज्ञतेची फुले अर्पण करताना मनात एकच भावना उमटते—
जगण्याचा अर्थ शिकवणारी,
संस्कारांची शिदोरी देणारी,
संकटातही सावली बनणारी,
माझी आईच माझी पहिली देवता!
या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला प्रत्येक मातृदेवतेला सादर वंदन!
आईच्या मायेचा सन्मान करूया… मातृदेवतेच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध करूया!
म्हणून म्हणावेसे वाटते,
*नऊ रूपे देवीची, नऊ रंग भक्तीचे,
पहिले रूप आईचे, अमृत तिच्या प्रीतीचे!
देव शोधण्याआधी तिच्या चरणी नतमस्तक व्हावे,
आईच्या आशीर्वादातच जीवनाचे सुख गवसावे!*
नवरात्रीच्या पहिल्या माळेला मातृदेवतेला त्रिवार वंदन!
✍🏻लेखिका::प्रा सौ सुषमा अरूण पाटील
जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित,
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर
फोन नं.9689166864

Comments
Post a Comment