पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयाच्या समीप!
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी; अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष
पुणे २८ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आघाडी घेतली असून, ते विजयाच्या समीप असल्याचे चित्र मतमोजणीच्या प्राथमिक कलांमधून समोर आले आहे. त्यांच्या आघाडीमुळे राजकीय वर्तुळातील उत्सुकता वाढली आहे. मात्र, अंतिम निकालाची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी एकूण ५३ हजार १८५ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली.
पसंतीक्रमाच्या मतमोजणीत गावडे आघाडीवर
शिक्षक मतदारसंघात एकूण ५१ हजार ५११ मते वैध ठरली असून, विजयी होण्यासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कौस्तुभ गावडे यांनी आघाडी घेतली. त्यांच्यापाठोपाठ शिवसेना समर्थित उमेदवार सचिन सानप आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यातही चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर हे प्राथमिक कलांमध्ये पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे.
अंतिम निकालाकडे लक्ष
या निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात असल्याने मतमोजणीची प्रक्रिया वेळखाऊ ठरली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराने विजयाचा आवश्यक कोटा पूर्ण केला नाही, तर नियमानुसार पुढील पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यामुळे कौस्तुभ गावडे यांची आघाडी अंतिम निकालात विजयात रूपांतरित होते का, याकडे शिक्षकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment