शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कौस्तुभ गावडे कटिबद्ध; इतिहासातील सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कौस्तुभ गावडे कटिबद्ध; इतिहासातील सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ; प्रमुख नेत्यांची उपस्थिती
पुणे ०९ सिटी न्यूज नेटवर्क
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे आणि विधान परिषदेत या घटकांचे प्रश्न ठामपणे मांडणे, या विषयांवर प्रचाराच्या माध्यमातून भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिक्षक व पदवीधर मतदारसंघांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेणारे नेतृत्व विधान परिषदेत असणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचा पाठपुरावा करणारे तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्याकडे पाहिले जात आहे. तसेच पदवीधरांच्या आकांक्षा, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या प्रश्नांवर डॉ. स्मिता जाधव प्रभावीपणे काम करतील, तसेच शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाची घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्रातही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा मिळत आहे. याच विकासाच्या प्रवाहात शिक्षण क्षेत्राला अधिक सक्षम बनवून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देवेंद्रजींच्या नेतृत्वात शिक्षकांच्या न्याय्य हक्कांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय व्हावेत यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, शिक्षकांवरील अनावश्यक अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व आवश्यक विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा करणे, तसेच जुनी पेन्शन योजना आणि शिक्षक सेवा-सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ठोस भूमिका मांडणे, हे आपल्या कार्याचे प्रमुख प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्रातील प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न ठेवता त्यावर धोरणात्मक उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शिक्षक संघटना, शिक्षक प्रतिनिधी आणि शासन यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी आपल्या मनोगतात तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य विकासाला चालना देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देणे, यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राजेश पांडे, शरद लाड, डॉ. प्रशम कोल्हे,धीरज घाटे, निरंजन डावखरे, मंजुषा नागपुरे, भैय्या माने, समित कदम जगदीश मुळीक, हेमंत रासने, निवेदिता एकबोटे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रचार शुभारंभामुळे भाजप-महायुतीच्या प्रचाराला गती मिळाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि पदवीधरांच्या विकासाच्या संधी या दोन प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Comments
Post a Comment