आदमापूर मधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध करणार

 आदमापूर मधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध करणार 




बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आज आंदोलन करणार


कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावधारकांना शपथ देण्याच्या प्रकारावरून सुरू झालेला वाद आता आदमापूरपर्यंत पोहोचला आहे. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने आज, रविवारी सकाळी आठ वाजता आदमापूर(ता. भुदरगड ) येथील बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर शपथ घेण्यात येणार आहे. सौंदती येथे शपथ घेऊनही पुन्हा आदमापुर येथे शपथ घेत महायुतीकडून ग्रामीण भागात अंधश्रद्धा पसरविण्याचा हा प्रकार सुरु आहे. या प्रकाराला विरोध दर्शवत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आदमापुर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.



गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून ठरावधारकांना कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात शपथ दिल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकारावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही शपथ देण्याच्या प्रकारावर प्रश्न उपस्थित करत ठरावधारकांवरील अविश्वासाबाबत टीका केली होती.


त्यानंतर आता छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने आदमापूर येथे शपथ घेण्यात येणार असल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीसारख्या लोकशाही प्रक्रियेत शपथा घेण्याच्या प्रकाराला विरोध करत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंदोलन करणार आहे.


गोकुळच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना शपथांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. आदमापूर येथे होणाऱ्या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शपथ आणि त्याविरोधातील आंदोलनामुळे मतदानाच्या दिवशी हा मुद्दा चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.

Comments