कोल्हापूरच्या वेशीवर बिबट्याची दहशत! लक्षतीर्थ वसाहतीत सीसीटीव्हीत कैद; ड्रोनद्वारे शोध सुरू
चंबुखडी टाकी ते शिंगणापूर बंधारा परिसरात १२ दिवसांपासून बिबट्याचा वावर; पुढील पाच दिवस ड्रोनद्वारे शोधमोहीम
कोल्हापूर(शिंगणापूर), १२ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहरालगतच्या लक्षतीर्थ वसाहत परिसरातील ‘दत्तनगर’ येथे बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या १२ दिवसांपासून चंबुखडी टाकी ते शिंगणापूर बंधारा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर येत असून, त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बिबट्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने वनविभागाची तारांबळ उडाली आहे.
शिंगणापूर-चिखली मार्गावरील शेतवडीत सर्वप्रथम बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम हाती घेतली. या काळात बिबट्या सुतारमळा आणि लक्षतीर्थ वसाहत परिसरात दिसल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. त्यानुसार वनविभागाने संबंधित परिसरात तपासणी केली; मात्र बिबट्याचा शोध लागला नाही.
शनिवारी (ता. १०) रात्री दीडच्या सुमारास हणमंतवाडीकडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचालकाला चंबुखडी येथे बिबट्या दिसून आला. त्याच दिवशी पहाटे सहाच्या सुमारास चंबुखडी टेकडी परिसरातील योगेश माने यांच्या निवासस्थानाच्या दारात बिबट्या दिसल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याशिवाय, मागील आठवड्यात बिबट्याने माने यांच्या पाळीव बदकाला भक्ष्य केल्याची माहिती दत्तात्रय माने यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
दोन तास शोधमोहीम; बिबट्याचा ठावठिकाणा नाही
या घटनांची माहिती मिळताच रविवारी (ता. १२) दुपारी १२ नंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक विदेश तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली चंबुखडी टाकी परिसरात सुमारे दोन तास शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेत बिबट्या आढळून आला नाही.
बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून पुढील पाच दिवस ड्रोनच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.
वनविभागाचे पथक शोधमोहिमेत सहभागी
या शोधमोहिमेत उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल आप्पासाहेब बुरटे आणि वनरक्षक विदेश तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुपर्यवेक्षक अमित कुंभार तसेच वन्यजीव बचाव पथकातील आशुतोष सूर्यवंशी, राकेश शिखरे आणि वैभव आवळे सहभागी होणार आहेत.
शहरालगतच्या वस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाकडून शोधमोहीम सुरू असून, नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment