जिओच्या आयपीओचा विक्रम; अँकर गुंतवणूकदारांकडून २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची मागणी
* ८,११० कोटी रुपयांच्या अँकर बुकच्या तुलनेत ३० पटींहून अधिक मागणी
* भारतीय आयपीओच्या इतिहासात प्रथमच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक मागणी
* एलआयसीपासून ब्लॅकरॉक, फिडेलिटी, जीआयसी आणि देशातील आघाडीच्या म्युच्युअल फंडांनीही दाखवला विश्वास
* एलआयसीला सर्वाधिक ५०० कोटी रुपयांचे समभाग वाटप
मुंबई, 20 सिटी न्यूज नेटवर्क
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमध्ये दिग्गज संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठी स्वारस्य दाखवले आहे. ८,११० कोटी रुपयांच्या अँकर बुकसाठी २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक मागणी नोंदवण्यात आली. म्हणजेच, अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या समभागांच्या तुलनेत ३० पटींहून अधिक मागणी झाली. भारतीय आयपीओच्या इतिहासात प्रथमच एखाद्या इश्यूला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक मागणी मिळाली आहे.
या विक्रमी मागणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिओवर विश्वास व्यक्त करणाऱ्या संस्थांची मोठी यादी. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या बचतीचा आणि गुंतवणुकीचा मोठा हिस्सा व्यवस्थापित करणाऱ्या नामांकित संस्थांचा समावेश आहे. एलआयसीसह एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड आणि निप्पॉन म्युच्युअल फंड यांसारख्या देशातील आघाडीच्या संस्थांनी अँकर बुकमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर ब्लॅकरॉक, कॅपिटल ग्रुप, फिडेलिटी, श्रोडर्स, जेपी मॉर्गन अॅसेट मॅनेजमेंट आणि एलियांझ यांसारख्या जागतिक स्तरावरील दिग्गज संस्थांनीही सहभाग नोंदवला.
केवळ म्युच्युअल फंडच नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या संस्थांनीही जिओला पसंती दिल्याचे दिसून आले. जीआयसी, एडीआयए, क्यूआयए आणि नॉर्गेस यांसारख्या सार्वभौम संपत्ती निधींसोबतच कॅलिफोर्निया स्टेट टीचर्स रिटायरमेंट, फ्लोरिडा रिटायरमेंट सिस्टीम, एसबीआय पेन्शन, एचडीएफसी पेन्शन, आयसीआयसीआय पेन्शन आणि यूटीआय पेन्शन यांसारख्या पेन्शन निधींनीही अँकर गुंतवणूकदार म्हणून सहभाग घेतला.
या अँकर बुकमध्ये २०० हून अधिक गुंतवणूकदार संस्था आणि निधी योजनांचा सहभाग होता. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष गुंतवणूकदार ड्रॅगोनियर, जॅनस हेंडरसन आणि नाइंटी वन यांनीही यात सहभाग नोंदवला. याशिवाय, एनाम, प्रेमजी आणि एचसीएल यांसारख्या भारतीय कौटुंबिक गुंतवणूक संस्थांचाही जिओच्या आयपीओमधील अँकर गुंतवणूकदारांमध्ये समावेश होता.
समभाग वाटपाचा विचार करता, एलआयसीला सर्वाधिक ५०० कोटी रुपयांचे समभाग वाटप करण्यात आले. ब्लॅकरॉक, कॅपिटल इंटरनॅशनल, फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च, जीआयसी, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांना प्रत्येकी सुमारे ४२५ कोटी रुपयांचे समभाग वाटप करण्यात आले. एकूण अँकर बुकचे मूल्य ८,११० कोटी रुपये होते.

Comments
Post a Comment