इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयपीपीएलचे आयोजन

 इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयपीपीएलचे आयोजन



कोल्हापूर ०३ सिटी न्यूज नेटवर्क 

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच आयपीपीएल (इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्लंबिंग क्षेत्रातील व्यावसायिक, दुकानदार तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना नवीन तंत्रज्ञान, संकल्पना आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


इंडियन प्लंबिंग असोसिएशन ही देशभरातील प्लंबिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हितासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. प्लंबिंग क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासोबतच समाजात प्लंबिंगचे महत्त्व, रोजगाराच्या संधी आणि नवनवीन तंत्रज्ञान व संकल्पनांची माहिती पोहोचविण्याचे काम संघटनेमार्फत केले जाते.


कोल्हापूर चॅप्टरमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्लंबिंग कामगार, व्यावसायिक आणि दुकानदारांचा समावेश आहे.


आयपीपीएलअंतर्गत सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी ३, १० आणि १७ ऑक्टोबर रोजी रोटरी समाज केंद्र, खानविलकर पंपासमोर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये थिअरेटिकल प्रेझेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तसेच प्रायोजक कंपन्यांकडून प्लंबिंग क्षेत्राशी संबंधित तांत्रिक माहिती देण्यात येणार आहे.


त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी लेखी (थिअरेटिकल) परीक्षा घेण्यात येणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी दोन जणांची एक टीम असणार आहे. प्रशिक्षण आणि परीक्षेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करून त्यांना चेन्नई येथे होणाऱ्या आयपीपीएलच्या अंतिम फेरीसाठी पाठविण्यात येणार आहे.


प्लंबिंग क्षेत्र हे पारंपरिक असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रात नवोदितांसाठीही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


इच्छुक उमेदवारांनी मधु किरण, न्यू महाद्वार रोड येथे संपर्क साधावा.


या उपक्रमासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग अरोरा आणि सचिव मनीष जैन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन कोल्हापूर चॅप्टरचे रवि साळुंखे, किरण जोशी, देवांग शेठ, गिरीश कुलकर्णी, सुशांत नांगरे आणि शीतल पाटील करीत आहेत.


प्रशिक्षण व स्पर्धेचा कालावधी : ३, १०, १७ आणि २४ ऑक्टोबर

टीम रचना : दोन जणांची एक टीम

ठिकाण : रोटरी समाज केंद्र, खानविलकर पंपासमोर

Comments