कणेरी मठ येथे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न

 कणेरी मठ येथे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न



देशभरातील सुमारे साडेपाचशे माजी सैनिक व कुटुंबीयांचा सहभाग; माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांवर मंथन

कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे (ABPSSP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरजवळील सिद्धगिरी कणेरी मठ येथे ३ व ४ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. देशाच्या विविध राज्यांतून सुमारे साडेपाचशे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी अधिवेशनात सहभाग घेतला.

अधिवेशनाचे उद्घाटन सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूजनीय श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत झाले. वंदे मातरम् आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाराजांनी आपल्या आशीर्वचनातून राष्ट्रीय सुरक्षेमध्ये सैनिकांच्या योगदानाचे कौतुक केले. बदलती जागतिक व भूराजकीय परिस्थिती तसेच सैनिकांसमोरील नवनवीन आव्हानांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्य अध्यक्ष एअरमार्शल प्रदीप बापट यांच्या भाषणानंतर माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. CSD व DIAV चे अधिकारी तसेच इन्फंट्री स्कूल, बेळगावचे डेप्युटी कमांडंट ब्रिगेडियर मराठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व विविध शंकांचे निरसन केले. देशातील विविध राज्यांच्या अध्यक्षांनी आपल्या राज्यातील परिषदेच्या कार्याचा आढावा सभेसमोर मांडला.

परिषदेचे सदस्य ग्रुप कॅप्टन तरुण सिंघा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या परमवीर चक्र विजेते शहीद अल्बर्ट एक्का यांच्या जीवनावरील चित्रपटाचा टीझर यावेळी माजी सैनिकांना दाखविण्यात आला.

सायंकाळच्या सत्रात कणेरी मठातील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी संगीत, शारीरिक कौशल्ये व विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

दुसऱ्या दिवशी परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील विविध योजना व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा राज्याच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. माजी सैनिकांच्या विविध समस्या व मागण्यांवर साधक-बाधक चर्चा करून त्या योग्य स्तरावर मांडण्यासाठी आवश्यक नियोजनावर विचारविनिमय करण्यात आला.

दरम्यान, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी यांची पुढील तीन वर्षांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

अग्निवीरांसाठी १० टक्के समांतर आरक्षणाचा निर्णय

समारोपाच्या सत्राला महाराष्ट्राचे माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. शंभूराज देसाई आवर्जून उपस्थित होते. त्यांनी माजी सैनिकांच्या नागरी जीवनातील योगदानाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्र  शासनाच्या प्रस्तावित सैनिकी मॉल, वॉर मेमोरियल तसेच माजी सैनिकांसाठीच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

अग्निवीरांच्या प्रश्नावर परिषदेने केलेल्या निवेदनाचा उल्लेख करताना महाराष्ट्र शासनाने सैनिक कल्याण विभागामार्फत अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी यांनी समारोपाच्या भाषणातून अधिवेशनातील कामकाजाचा आढावा घेत भविष्यातील कार्यासाठी दिशादर्शन केले.

परिषदेचे मार्गदर्शक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख श्री. प्रदीप जी जोशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी सैनिकांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून नवनवीन विचार, उपक्रम आणि मार्गांनी राष्ट्रसेवा कशी करता येईल, याबाबत त्यांनी मंथन करण्याचे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी व श्री. प्रदीप जी जोशी यांनी सैन्य मातृशक्तीसोबत विशेष संवाद साधला. जिजाऊंच्या प्रेरणेने मातृशक्तीचे राष्ट्रनिर्माणातील योगदान अधोरेखित करण्यात आले.

राष्ट्रगीताने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता झाली.

  या प्रसंगी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद चे महाराष्ट्र अध्यक्ष एअरमार्शल प्रदीप बापट, उपाध्यक्ष एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य, ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव आणि पदाधिकारी उपस्थित होते

या भव्य अधिवेशनाच्या आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी कर्नल सुळकुडे, नायक आण्णासाहेब कुंभार तसेच कोल्हापूर माजी सैनिक टीमने विशेष परिश्रम घेतले. तसेच कणेरी मठाचे सीईओ व सर्व पदाधिकाऱ्यांचेही आयोजनासाठी मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला.

Comments