कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांना आता राज्यसभेत आवाज मिळणार
खासदार चंद्रकांत हंडोरे यांना रेल्वे प्रश्नांचे निवेदन; राज्यसभेत मुद्दे उपस्थित करण्याचे आश्वासन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना न्याय मिळावा आणि जिल्ह्याच्या रेल्वे विकासाला गती मिळावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या वतीने राज्यसभेचे खासदार तथा महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना निवेदन देण्यात आले. या रेल्वे प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आगामी काळात राज्यसभेत हे मुद्दे उपस्थित करण्याचे आश्वासन खासदार हंडोरे यांनी दिले.
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज हॉलमध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार चंद्रकांत हंडोरे यांची कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
रेल्वे प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली सह्याद्री एक्सप्रेस (11023/11024) मुंबईपर्यंत तातडीने पूर्ववत सुरू करावी. तसेच कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय कोल्हापूर-गडहिंग्लज-आजरा-चंदगड-सावंतवाडी या नवीन रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला गती देऊन कोल्हापूर जिल्हा कोकण आणि गोव्याशी रेल्वेने जोडावा, अशी मागणीही करण्यात आली. कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा, तसेच जिल्ह्यातील इतर प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर प्रभावी कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
रेल्वे विकासासाठी पाठपुरावा सुरूच राहणार
कोल्हापूरच्या रेल्वे विकासाच्या दृष्टीने मांडण्यात आलेल्या या मागण्यांवर राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी दिल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
रेल्वे विकासाचा हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि उद्योजक यांच्या हितासाठी आहे. कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांची पूर्तता होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची भूमिका संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम, वसंतराव पुरी बुवा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सुनील कानूरकर, भीमशक्ती संघटनेचे दक्षिण जिल्हा प्रभारी संजय कांबळे आणि शिवगोंडा पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचा रेल्वे विकास हेच ध्येय असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघाचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे ॲड. चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट केले.


Comments
Post a Comment