भारतातील सर्वात मोठ्या आयपीओपूर्वी जिओने मांडला दूरदर्शी विकासाचा रोडमॅप; तीन प्रमुख ग्रोथ इंजिनवर लक्ष केंद्रित
भारतातील सर्वात मोठ्या आयपीओपूर्वी जिओने मांडला दूरदर्शी विकासाचा रोडमॅप; तीन प्रमुख ग्रोथ इंजिनवर लक्ष केंद्रित
* आकाश अंबानी यांनी मोबिलिटी, होम आणि एंटरप्राइज-इंटरनॅशनल यांना जिओची तीन प्रमुख विकास इंजिन्स म्हणून केले अधोरेखित
* होम ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या सुमारे ३ कोटींवरून १० कोटी घरांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
* निवडक परदेशी बाजारपेठांमध्ये स्वतःच्या तंत्रज्ञान प्रणालीचे व्यावसायिकीकरण करण्याची तयारी
मुंबई, १५ सिटी न्यूज नेटवर्क
भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओपूर्वी जिओ प्लॅटफॉर्म्सने आपल्या विकासाच्या पुढील टप्प्याचा रोडमॅप सादर केला आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी मोबिलिटी, होम आणि एंटरप्राइज-इंटरनॅशनल या तीन क्षेत्रांना कंपनीची प्रमुख विकास इंजिन्स असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान, डिजिटल प्रवेशद्वारे आणि भक्कम पायाभूत सुविधांच्या बळावर आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत भारताच्या सुमारे १.४ ट्रिलियन डॉलरच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्याची क्षमता कंपनीकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आकाश अंबानी म्हणाले, “आमच्या व्यवसायातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा ग्राहक.” प्रत्येक भारतीय नागरिक, प्रत्येक घर आणि प्रत्येक उद्योगसमूहाला अधिक चांगल्या व किफायतशीर डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यावर जिओचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जिओकडे सुमारे ५३.३ कोटी कनेक्टिव्हिटी ग्राहक असून, भारतातील एकूण डेटा वाहतुकीपैकी ६० टक्क्यांहून अधिक डेटा वाहतूक जिओच्या नेटवर्कवरून होते.
मोबिलिटी : पुढील पाच वर्षांत ३४ कोटी ग्राहकांची संधी
मोबिलिटी क्षेत्रात पुढील पाच वर्षांत सुमारे ३४ कोटी नवीन ४जी आणि ५जी ग्राहकांची बाजारपेठ निर्माण होण्याची अपेक्षा कंपनीला आहे. आकाश अंबानी यांच्या मते, यापैकी सुमारे १० कोटी ग्राहक प्रथमच मोबाइल कनेक्शन घेणारे असतील, तर सुमारे २४ कोटी ग्राहक २जीवरून ४जी आणि ५जी सेवांकडे वळू शकतात. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिओच्या निव्वळ सक्रिय मोबाइल ग्राहकसंख्येत झालेली वाढ ही दुसऱ्या क्रमांकाच्या ऑपरेटरच्या तुलनेत सुमारे तिप्पट होती.
होम ब्रॉडबँड : १० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
आगामी वर्षांतील विकासाचे एक महत्त्वाचे इंजिन म्हणून कंपनी होम ब्रॉडबँडकडे पाहत आहे. जिओचे सध्या सुमारे २.८६ कोटी फिक्स्ड ब्रॉडबँड ग्राहक असून, ही संख्या वाढवून १० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशात नव्याने जोडल्या गेलेल्या एकूण फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शन्सपैकी सुमारे ६७.५ टक्के वाटा जिओचा होता. आकाश अंबानी यांनी सांगितले की, फायबर नेटवर्कसह स्वतःच्या वायरलेस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनी देशातील १९,००० पिनकोड क्षेत्रांमध्ये आपली पोहोच वाढवत आहे.
एंटरप्राइज आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय : भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत नेण्याची तयारी
एंटरप्राइज आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय हे जिओचे तिसरे प्रमुख विकास इंजिन असेल. भारतातील एंटरप्राइज डिजिटल सेवा बाजारपेठेचा आकार सुमारे ५.१ लाख कोटी रुपये, म्हणजेच ५६.८ अब्ज डॉलर असल्याचे जिओचे आकलन आहे. देशातील सुमारे ६५ टक्के बँक शाखा जिओच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत, अशी माहिती आकाश अंबानी यांनी दिली.
जिओने स्वतः विकसित केलेली एंड-टू-एंड तंत्रज्ञान प्रणाली निवडक परदेशी बाजारपेठांमध्ये व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. केवळ सॉफ्टवेअर विकण्यापुरते मर्यादित न राहता, जागतिक दूरसंचार कंपन्यांसोबत व्यवस्थापित सेवा भागीदार म्हणून काम करण्यावर जिओचा भर असेल. यामुळे भारताला तंत्रज्ञान आयात करणाऱ्या देशाकडून तंत्रज्ञान निर्यात करणाऱ्या देशाकडे वाटचाल करण्यास मदत होऊ शकते, असे आकाश अंबानी यांनी नमूद केले.
यापूर्वी ईशा अंबानी यांनी जिओच्या सुरुवातीचा आणि रिलायन्सच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा उल्लेख करताना सांगितले की, कंपनी दीर्घकालीन विचार, मोठ्या प्रमाणावरील विस्तार, प्रभावी अंमलबजावणी आणि आर्थिक शिस्त या तत्त्वांवर विश्वास ठेवते.
पत्रकार परिषदेला सुरुवात करताना उदय कोटक यांनी रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी आणि १९७७ मध्ये झालेल्या रिलायन्सच्या आयपीओच्या आठवणींना उजाळा दिला.

Comments
Post a Comment