आता माघार नाही , पदवीधर निवडणूक लढवणारच - प्रताप उर्फ भैया माने
माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा केला दावा
कोल्हापूर (कागल) ०३ सिटी न्यूज नेटवर्क
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मधील कागलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे संभाव्य उमेदवार प्रताप उर्फ भैय्या माने यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचे आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हे बंड नव्हे तर माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या कार्यकर्तृत्वाची लढाई आहे , आता कमबॅक नाही, तर पुढे जाण्याची वेळ आहे असे प्रताप माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महायुतीच्या जागावाटपात पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने भैया माने नाराज असल्याचे बोलले जात होते, आज त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक लढवणार असून गेली ५ वर्षे मी यासाठी तयारी केली असून शिवाजी विद्यापीठ सिनेट मधील आपल्याला १५ वर्षांचा अनुभव असल्याचे सांगितले.
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढलो आहे. पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढवत आहे. कोणावरही टीका करण्यासाठी नव्हे, तर माझ्या कामाच्या जोरावर पदवीधर मला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, पदवीधरांच्या रोजगार, शिक्षण आणि इतर प्रलंबित प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज भरणार
येत्या सोमवारी सकाळी १० वाजता आपण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची अधिकृत घोषणा प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले आहे.

Comments
Post a Comment