किशोर घाटगे यांना ‘इंटरनॅशनल शांतीदूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर
३५ वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल; ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात होणार पुरस्कार वितरण
कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क
गेली ३५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांना प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल शांतीदूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. विविध सामाजिक उपक्रम, सीमेवरील जवानांसाठीचे कार्य आणि कोल्हापूरच्या जनहिताच्या प्रश्नांवर दिलेल्या लढ्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शांतीदूत परिवाराच्या वतीने, सर्किट बेंच फाउंडेशन, इंडियन पोलीस मित्र भारत आणि डॉ. सुरेश राठोड फाउंडेशन यांच्या संलग्नतेने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील महाराष्ट्र भवनात केंद्रीय मंत्री तसेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
किशोर घाटगे हे गेल्या ३५ वर्षांपासून कोल्हापूर आणि परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळापासून त्यांनी सीमेवरील जवानांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. समाजामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, या उद्देशानेही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी साडेचार हजारांहून अधिक विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेसह विविध पेन्शन योजनांसाठी मोफत अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर झालेल्या आंदोलनांमध्येही घाटगे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. टोलविरोधी आंदोलन, कोल्हापूर खंडपीठ आंदोलन, हद्दवाढीचा प्रश्न, आखरी रास्ता कृती समितीच्या माध्यमातून रस्त्यांसाठीचे आंदोलन, हेल्मेटविरोधी आंदोलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुलासंदर्भातील आंदोलन अशा विविध चळवळींमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला. पुराच्या काळात पूरग्रस्तांना मदत, वैद्यकीय शिबिरांचे आयोजन आणि इतर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही त्यांनी योगदान दिले आहे.
जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठविताना त्यांनी अनेकदा कायदेशीर आव्हानांनाही सामोरे जात सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारामुळे किशोर घाटगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्यावर कोल्हापूरसह विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment