जिओने एअरटेलच्या तुलनेत जवळपास १० पट अधिक कोअर मोबाइल ग्राहक जोडले

 जिओने एअरटेलच्या तुलनेत जवळपास १० पट अधिक कोअर मोबाइल ग्राहक जोडले



• सप्टेंबरमध्ये जिओच्या ग्राहकसंख्येत १९ लाख, तर एअरटेलच्या ग्राहकसंख्येत २ लाखांची वाढ


• देशातील कोअर मोबाइल ग्राहकांच्या एकूण वाढीत जिओचा वाटा जवळपास ८६ टक्के; सक्रिय ग्राहकसंख्येतही वाढ


• कोअर मोबाइल ग्राहकांची गणना करताना यंत्रे आणि उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन-टू-मशीन (M2M) कनेक्शनचा समावेश केला जात नाही.

मुंबई ३० सिटी न्यूज नेटवर्क 

शेअर बाजारातील दमदार पदार्पणानंतर रिलायन्स जिओसाठी मोबाइल ग्राहकांच्या आघाडीवरही आनंदाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) सप्टेंबर महिन्यातील अहवालावर आधारित डीएएम कॅपिटल आणि आयआयएफएल कॅपिटलच्या विश्लेषणानुसार, मशीन-टू-मशीन (M2M) कनेक्शन वगळल्यानंतर जिओच्या मोबाइल ग्राहकसंख्येत १९ लाखांची वाढ झाली, तर एअरटेलच्या ग्राहकसंख्येत २ लाखांची भर पडली. म्हणजेच, जिओने एअरटेलच्या तुलनेत जवळपास १० पट अधिक कोअर मोबाइल ग्राहक जोडले. देशातील या श्रेणीतील मोबाइल ग्राहकसंख्येत एकूण २२ लाखांची वाढ झाली असून, त्यातील जवळपास ८६ टक्के वाटा एकट्या जिओचा आहे.


सक्रिय मोबाइल ग्राहकांच्या बाबतीतही जिओने दमदार कामगिरी केली. डीएएम कॅपिटलच्या अहवालानुसार, M2M कनेक्शन वगळून केलेल्या गणनेत सप्टेंबर महिन्यात जिओच्या सक्रिय ग्राहकसंख्येत १३ लाखांची वाढ झाली. याउलट, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या सक्रिय ग्राहकसंख्येत घट नोंदवण्यात आली. एअरटेलचे २ लाख, तर व्होडाफोन आयडियाचे ३ लाख सक्रिय ग्राहक कमी झाले. या कालावधीत देशातील सक्रिय मोबाइल ग्राहकसंख्येत एकूण ६ लाखांची वाढ झाली.


एकूण मोबाइल ग्राहकसंख्येच्या बाबतीतही जिओने आपली आघाडी कायम राखली आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरअखेर जिओचे ५१.११ कोटी मोबाइल ग्राहक होते, तर एअरटेलचा ग्राहकवर्ग ४९.४३ कोटी होता. व्होडाफोन आयडियाचे २०.०१ कोटी, तर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे ९.४३ कोटी मोबाइल ग्राहक होते. या एकूण ग्राहकसंख्येत M2M कनेक्शनचाही समावेश आहे.

Comments