हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संभवनाथ जैन मंदिरात भव्य महापूजा व सुवर्णमय अंगरचना उत्साहात संपन्न
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संभवनाथ जैन मंदिरात भव्य महापूजा व सुवर्णमय अंगरचना उत्साहात संपन्न
कोल्हापूर ०३ सिटी न्यूज नेटवर्क
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, संभवनाथ चौक, गुजरी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य महापूजा व परमात्म्याची सुवर्णमय अंगरचना हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय, उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
परमपूज्य आचार्य भगवंत श्री अभयशेखरसूरीश्वरजी महाराज साहेब यांचे शिष्यरत्न प.पू. पंन्यास श्री जयभानुशेखर विजयजी गणिवर्य आदि ठाणा तसेच प.पू. साध्वीजी श्री क्रियानिधिश्रीजी महाराज साहेब आदि ठाणा यांच्या पावन निश्रेत या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महापूजेनिमित्त परमात्म्याची अत्यंत नयनरम्य सुवर्णमय अंगरचना साकारण्यात आली होती. संपूर्ण रंगमंडप दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता.
सजावटीसाठी देशी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. ही आकर्षक पुष्पसजावट साकारण्यासाठी खास मुंबई येथून कुशल कारागीर बोलावण्यात आले होते. त्यांच्या कलाकुसरीतून मंदिर परिसर व रंगमंडपाला अत्यंत मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते.
महापूजेमध्ये १०८ पार्श्वनाथांपैकी जगवल्लभ पार्श्वनाथाचे विशेष महत्त्व, तसेच जीवदया, अनुकंपा आणि दानधर्माचा संदेश अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला.
२५ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रांगोळी
या महापूजेचे विशेष आकर्षण म्हणजे प.पू. आचार्य सूरिमंत्राराधक श्री जयशेखर सूरीश्वरजी महाराज साहेब यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त साकारण्यात आलेली विशेष रांगोळी होय. गुरुदेवांच्या पावन स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कलात्मक रांगोळीने उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या भव्य आयोजनामध्ये समाजातील विविध सेवाभावी ग्रुपनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शासन विहार ग्रुप, मंगलघर वेयावच्च ग्रुप तसेच जैनिझम ग्रुप यांच्या माध्यमातून जीवदया, अनुकंपा व दानाच्या विविध उपक्रमांना सुंदर सहकार्य लाभले. विविध सेवाकार्यांत सहभागी युवक व कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध आणि समर्पित सेवा दिली.
✨ गौतमलब्धि ग्रुपची २७ वर्षांची अखंड सेवा ✨
या महापूजा व अंगरचनेची विशेष जबाबदारी गेली २७ वर्षे अखंड व अविरतपणे महापूजेची सेवा करणाऱ्या श्री गौतमलब्धि ग्रुप, गुजरी, कोल्हापूर यांनी समर्थपणे पार पाडली.
गौतमलब्धि ग्रुपच्या सर्व युवकांनी अनेक दिवसांपासून या सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करून अथक परिश्रम घेतले. अंगरचना, सजावट, धार्मिक मांडणीपासून ते कार्यक्रमाच्या विविध व्यवस्थांपर्यंत प्रत्येक बाबतीत युवकांनी तन-मनाने सेवा देत हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
या कार्यासाठी अनिलभाई गुरुजी यांचे विशेष सहकार्य, तसेच अरिहंत सेवा ग्रुप व पाठशाला परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व विश्वस्तांनी गौतमलब्धि ग्रुपच्या युवकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला. समाजातील विविध संस्था, ग्रुप, सेवाभावी कार्यकर्ते आणि लाभार्थी परिवार यांच्या सामूहिक सहकार्यामुळे हा धार्मिक सोहळा अधिक भव्य, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
महापूजेच्या दर्शनासाठी हजारो श्रावक-श्राविका व भाविकांनी उपस्थिती दर्शविली. परमात्म्याची सुवर्णमय अंगरचना, देशी फुलांची मनमोहक सजावट, दिव्यांची आकर्षक रोषणाई, विशेष रांगोळी आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर धर्ममय झाला होता.
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, गुजरी, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सामूहिक सहकार्याने हा भव्य महापूजा व अंगरचना सोहळा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Comments
Post a Comment