कोल्हापूर बाजार समितीत शेतकरी-केंद्रित CSR विकास आराखड्यावर चर्चा
![]() |
| प्रमुख उपस्थित सभापती प्रा. शेखर देसाई, सचिव श्री. तानाजी दळवी, सहाय्यक सचिव श्री.संभाजी मगदूम, श्री.अजित देसाई, प्रा. विजय कोटकर, कमलेश कांबळे, संदीप सावंत इत्यादी |
स्वच्छता, कचऱ्यापासून खत निर्मिती, कृषी प्रक्रिया, शेतकरी सुविधा आणि सौरऊर्जा प्रकल्पांचा प्रस्ताव
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी ‘कोल्हापूर शेतकरी समृद्धी व कृषी बाजार विकास CSR मिशन’ राबविण्याबाबत आज बाजार समितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस प्रमुख उपस्थित कोल्हापूर बाजार समितीचे सभापती प्रा. शेखर देसाई,, सचिव श्री. तानाजी दळवी, सहाय्यक सचिव श्री.संभाजी मगदूम, श्री.अजित देसाई, प्रा. विजय कोटकर, कमलेश कांबळे, संदीप सावंत इत्यादी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये CSR निधीच्या माध्यमातून बाजार समिती परिसरात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शेतकरी सुविधा व डिजिटल माहिती केंद्र, आधुनिक कृषी प्रशिक्षण केंद्र, कृषी माल प्रक्रिया व मूल्यवर्धन केंद्र, Cold Storage व Post-Harvest सुविधा, शेतकरी आरोग्य उपक्रम, महिला शेतकरी व बचतगटांसाठी उद्योजकता केंद्र, सौरऊर्जा प्रकल्प, पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधा यांसह विविध प्रकल्पांचा प्रस्ताव मांडण्यात आला.
बाजार समितीत ‘कचऱ्यापासून खत’ प्रकल्प
बाजार समितीत निर्माण होणाऱ्या भाजीपाला, फळे व इतर जैविक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करून त्यावर प्रक्रिया करत कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबतही चर्चा झाली.
या प्रकल्पामुळे बाजार समिती परिसरातील स्वच्छता सुधारण्यासोबतच जैविक कचऱ्याचा पुनर्वापर होऊन त्यापासून तयार होणारे खत शेतीसाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे ‘स्वच्छ बाजारपेठ – कचऱ्याचे खत – शेतीला फायदा’ अशी संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या बैठकीत सुमारे ₹५ कोटींच्या प्राथमिक CSR प्रकल्प आराखड्याची संकल्पना मांडण्यात आली. एकाच कंपनीकडून संपूर्ण निधी मिळविण्याऐवजी विविध CSR कंपन्यांसाठी स्वतंत्र प्रकल्पांचे ‘CSR Project Bank’ तयार करून निधी उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
प्रत्येक प्रकल्पासाठी गरजांचे सर्वेक्षण, तांत्रिक व्यवहार्यता, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), CSR पात्रता, अंदाजपत्रक, अंमलबजावणी आराखडा आणि परिणाम मोजणीची व्यवस्था तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. युवराज येडूरे यांनी, “बाजार समिती ही केवळ शेतमालाच्या विक्रीची जागा न राहता शेतकरी विकास, स्वच्छता, पर्यावरण आणि आधुनिक कृषी सुविधांचे केंद्र बनले पाहिजे. CSRच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित प्रकल्प उभारून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे,” असे सांगितले.
“शेतकऱ्यांच्या गरजेतून प्रकल्प, प्रकल्पातून CSR निधी आणि CSR निधीतून मोजता येणारा सामाजिक परिणाम” या संकल्पनेवर आधारित कोल्हापूर बाजार समितीसाठी एक आदर्श शेतकरी-केंद्रित व स्वच्छ-हरित CSR मॉडेल विकसित करण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरली.

Comments
Post a Comment