अवघ्या १०० मिनिटांत १००% सबस्क्रिप्शन; देशातील सर्वात मोठ्या जिओ IPO ची दमदार सुरुवात

 अवघ्या १०० मिनिटांत १००% सबस्क्रिप्शन; देशातील सर्वात मोठ्या जिओ IPO ची दमदार सुरुवात




* जिओ IPO ला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद; पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांची (QIB) श्रेणी ३.६८ पट सबस्क्राइब

* पहिल्याच दिवशी १० लाखांहून अधिक अर्ज; अँकर गुंतवणूकदारांकडूनही ३० पटांहून अधिक मागणी

* रिलायन्सच्या भागधारकांसाठी २,५०० कोटी रुपयांच्या समभागांचे आरक्षण; समभाग मिळवण्याची अतिरिक्त संधी


मुंबई, २१ सिटी न्यूज नेटवर्क 

 देशातील सर्वात मोठ्या, ३०,२१३ कोटी रुपयांच्या जिओ आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बुधवारी सकाळी खुल्या झालेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला अवघ्या १०० मिनिटांत १०० टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. ताज्या आकडेवारीनुसार, या आयपीओला एकूण १.१४ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) राखीव असलेला हिस्सा ३.६८ पट सबस्क्राइब झाला असून, एकूण १० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. हा आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.


जिओच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या उत्साहाची झलक आधीच पाहायला मिळाली होती. अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या सुमारे ८,११० कोटी रुपयांच्या समभागांच्या तुलनेत २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बोली प्राप्त झाल्या होत्या. म्हणजेच, या समभागांसाठी ३० पटांहून अधिक मागणी नोंदवण्यात आली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) सुमारे ५०० कोटी रुपयांचे सर्वाधिक वाटप करण्यात आले होते.


आयपीओच्या आकारमानाच्या बाबतीतही जिओने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओ असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या नावावर देशातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम होता. जिओच्या आयपीओसाठी प्रति समभाग १,०६५ ते १,११९ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, आयपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाला असला, तरी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पात्र भागधारकांना समभाग मिळवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी २,५०० कोटी रुपयांपर्यंतच्या समभागांचे आरक्षण करण्यात आले आहे. पात्र गुंतवणूकदार भागधारक श्रेणीसह किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीतही अर्ज करू शकतात. त्यामुळे त्यांना समभाग मिळवण्याची आणखी एक संधी मिळू शकते.

Comments