TET सक्तीविरोधात आवाज उठविणार; जुन्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! — शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

 TET सक्तीविरोधात आवाज उठविणार; जुन्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! — शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे



१३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा; गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचीही तयारी


पुणे १५ सिटी न्यूज नेटवर्क 

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्तीच्या मुद्द्यावर राज्यातील शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET मधून सूट मिळावी, यासाठी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करणार असल्याची भूमिका पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान मांडली. या प्रश्नासंदर्भात यापूर्वीही शासनाकडे वेळोवेळी निवेदने सादर करून शिक्षकांच्या अडचणींकडे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक असल्यास या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचीही आपली तयारी असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.



अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा, योगदानाचा आणि सेवाज्येष्ठतेचा सन्मान राखला गेला पाहिजे. आयुष्याची अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी समर्पित केलेल्या शिक्षकांच्या सेवासुरक्षेबाबत अनिश्चितता निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे शिक्षकांवर अन्यायकारक ठरणाऱ्या निर्णयांविरोधात योग्य त्या स्तरावर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.


शालेय शिक्षण विभागाच्या २३ ऑगस्ट २०१३ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासंदर्भात तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही TET उत्तीर्ण होण्याच्या सक्तीचा प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या आणि आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केलेल्या शिक्षकांच्या भवितव्याचा विचार संवेदनशीलतेने होणे आवश्यक असल्याचे गावडे यांनी नमूद केले.


आज शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित राहिलेली नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विविध ऑनलाइन माहिती संकलन, शासकीय उपक्रमांची पूर्तता, निवडणूकविषयक जबाबदाऱ्या आणि इतर अशैक्षणिक कामांच्या वाढत्या व्यापामुळे शिक्षकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांना पुन्हा पात्रता परीक्षेच्या सक्तीला सामोरे जावे लागणे, हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे गावडे यांनी सांगितले.


शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी झाला पाहिजे. त्यांच्या मनात सेवेसंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी न्यायालयीन निर्णयाचा पूर्ण आदर राखून कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर योग्य मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. विशेषतः १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी TET पात्रतेच्या निकषांमध्ये कायदेशीर चौकटीत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.


१३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET मधून सूट देण्याच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. यासाठी आवश्यक कायदेशीर बाबी तपासून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी आणि शिक्षकांची बाजू प्रभावीपणे मांडावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. शिक्षकांच्या सेवाशर्ती, सेवाज्येष्ठता, आजवरचे योगदान, वय आणि प्रत्यक्ष शैक्षणिक परिस्थिती यांचा समतोल विचार करून न्याय्य तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.


पुणे दौऱ्यादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना TET सक्तीच्या प्रश्नासह शिक्षकांच्या सेवासुरक्षा, सेवाशर्ती आणि शैक्षणिक व्यवस्थेतील विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या प्रत्यक्ष समस्या आणि शैक्षणिक संस्थांसमोरील आव्हाने जाणून घेत कौस्तुभ गावडे यांनी हे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याची भूमिका व्यक्त केली. शिक्षकांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षकांचे हक्क, सेवासुरक्षा, सन्मान आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित यांचा समतोल साधत शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने कार्यरत राहणार आहोत. दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. TET सक्तीच्या प्रश्नावर शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासन दरबारी पाठपुरावा करणार आणि गरज पडल्यास शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही करणार, असा निर्धार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.

Comments