आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त २४ नोव्हेंबरला ‘राजेश चषक’ कुराश स्पर्धा
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर कुराश असोसिएशन आणि शिवसेनेच्या वतीने ‘राजेश चषक’ कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळवार पेठेतील बजाबराव माने तालीम हॉल येथे या स्पर्धा पार पडणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर घाटगे आणि शरद पोवार यांनी दिली.
या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४, १७ वर्षांखालील तसेच १७ वर्षांवरील मुले आणि मुली अशा विविध वयोगटांत एकूण ४४ वजन गटांमध्ये होणार आहेत. कुराशच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वयोगटातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींना ‘बेस्ट कुराश खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सांघिक विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख पारितोषिकासह राजेश चषक प्रदान करण्यात येणार असून, शिस्तबद्ध संघालाही विशेष चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आकाश चिले, अमित भोसले, गावरान पडळकर, शीला खोत आणि ज्योती सुळेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Comments
Post a Comment