गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग,सोमवारी संघर्ष मोर्चा

 गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग,सोमवारी संघर्ष मोर्चा



महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धार


कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

 गोकुळच्या सत्तासंघर्षाची धग आता थेट रस्त्यावर पोहोचणार असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी झाली.


बैठकीत महायुतीवर गोकुळची सत्ता बळकावण्यासाठी कुटील राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चात कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान आणि ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हुकूमशाही मोडून काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढू, असा आक्रमक इशारा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला. ही लढाई केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, देशाची लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सुनील मोदी यांनी केले. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असून, कोल्हापुरातील कामगार, झेन-जी तरुण आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान उंचावावा, असे आवाहन आनंद माने यांनी केले.  तर गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शासनाला काळा कायदा रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा सरलाताई पाटील यांनी दिला. काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

  

बैठकीत जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, नगरसेवक सुनील मोदी, दुर्वास कदम, आनंद माने, सरलाताई पाटील, अमर पाटील, माजी नगरसेवक धनंजय सावंत आदींनी आपली भूमिका मांडली. बैठकीला महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक मधुकर रामाने, नगरसेविका ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, उदयानी साळुंखे, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, एम. आर. पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणवीर मोरे, भरत रसाळे आदी उपस्थित होते.

Comments