करवीर पंचायत समितीचे आरोग्य स्नेहसंमेलन उत्साहात; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली नव्या ऊर्जेची प्रेरणा
करवीर पंचायत समितीचे आरोग्य स्नेहसंमेलन उत्साहात; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली नव्या ऊर्जेची प्रेरणा
उजळाईवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन; कर्करोग जनजागृती, क्षयरोगावर पथनाट्य आणि उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर 01 सिटी न्यूज नेटवर्क
करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविकांसाठी आयोजित करण्यात आलेले ‘आरोग्य स्नेहसंमेलन २०२६’ आज उजळाईवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य तथा बांधकाम सभापती सारिका नांद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्षभर नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविका यांना दैनंदिन कामाच्या ताणतणावातून विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच परस्परांमध्ये स्नेहभाव आणि नवचैतन्य निर्माण व्हावे, या उद्देशाने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. रेश्मा पवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून कर्करोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याविषयी त्यांनी माहिती दिली. तर कणेरी येथील आशा सेविकांनी क्षयरोग जनजागृतीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आरोग्य विभागात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले.
यावेळी बोलताना आरोग्य सभापती सारिका नांद्रेकर यांनी, आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे स्वास्थ्य चांगले राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना कर्मचाऱ्यांनाही मानसिक आनंद, विरंगुळा आणि नवीन ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. अशा स्नेहसंमेलनांमुळे काम करण्याची नवी उमेद निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सातापा पाटील, उपसभापती दिपाली पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने, पंचायत समिती सदस्य, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उपक्रम, मार्गदर्शन आणि गुणगौरव सोहळ्यामुळे हे स्नेहसंमेलन आनंददायी वातावरणात पार पडले.

Comments
Post a Comment