कोल्हापूर आगारातर्फे परगावच्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा आनंददायी अभ्यंगस्नान उपक्रम

 कोल्हापूर आगारातर्फे परगावच्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा आनंददायी अभ्यंगस्नान उपक्रम 



गेली २० वर्षे अखंड परंपरा; घरापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आनंदमय


कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क 

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण. मात्र सणासुदीच्या काळातही प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या आणि घरापासून दूर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून कोल्हापूर आगारातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही बाहेरील विभागातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाची विशेष व्यवस्था करण्यात आली.




या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सुगंधित उटणे, सुवासिक तेल, साबण आणि लाडू-चिवडा अशा दिवाळी फराळाचे पाकीट देऊन कर्मचाऱ्यांचा सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.


विशेष म्हणजे, घरापासून दूर राहून प्रवाशांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद आणि घरगुती सणासुदीचा अनुभव मिळावा, या उद्देशाने कोल्हापूर आगारातर्फे गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत आहे. आगाराच्या या उपक्रमातून एसटी कर्मचाऱ्यांप्रती असलेली आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.


याशिवाय कोल्हापूर बसस्थानक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुंदर रांगोळीची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे बसस्थानक परिसरात दिवाळीचे प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


यावेळी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) श्री. गणेश कोळी व आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) श्री. अतुल मोरे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना अभ्यंगस्नानासाठी लागणारे गरम पाणी, साबण, तेल, उटणे तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी श्री. अविनाश कडगे, श्री. सौरभ इंगळे आणि स्थानक प्रमुख श्री. मल्लेश विभुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. दिपक घारगे, वाहतूक नियंत्रक श्री. राकेश कांबळे, श्री. अनिल गुजर, श्री. महेश चौगुले, श्री. तेजस बागडी, श्री. निळकंठ कळंत्रे, श्री. सुहास कुंभार आणि श्री. श्रीसुंदर यांनी विशेष नियोजन व परिश्रम घेतले.


कर्तव्याच्या धावपळीत सणांचा आनंद विसरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा कोल्हापूर आगाराचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकी, आपुलकी आणि कर्मचारी कल्याणाचा आदर्श ठरत आहे.

Comments