केडीसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचे काम लवकरच ३६० कोटींचे; ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
केडीसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचे काम लवकरच ३६० कोटींचे; ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
कोल्हापूर 01 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महत्त्वाकांक्षी केडीसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित ३६० कोटी रुपयांच्या या स्टेडियम प्रकल्पासाठी ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
यासंदर्भात स्टेडियम तांत्रिक समिती आणि मूल्यांकन समितीची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला केडीसीएचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
यापूर्वी २५ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर नियुक्त करण्याबाबत मौलिक सूचना केल्या होत्या. त्यानुसार ४ ऑगस्ट २०२६ रोजी दैनिक बिझनेस स्टँडर्डमध्ये निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेत इच्छुक संस्थांनी सहभाग घेतला होता.
संबंधित संस्थांच्या कामाचा अनुभव, कार्यपद्धती आणि क्षमता विचारात घेऊन निवडक संस्थांना ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील यॉट क्लब येथे प्रस्तावित केडीसीए स्टेडियम ३६० प्रकल्पाच्या डिझाइन, मैदान आणि त्यासंबंधित सुविधांची पाहणी करण्याची संधी देण्यात आली. या पाहणीनंतर पात्र ठरलेल्या चार संस्थांनी २९ व ३० ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात मूल्यांकन समितीसमोर सविस्तर सादरीकरण केले.
आज झालेल्या संयुक्त बैठकीत बंगळुरू येथील तज्ज्ञ व अनुभवी सदस्य श्रीकांत के. यांनी मूल्यांकन समितीचा अहवाल सादर केला. या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित संस्थांची कार्यपद्धती आणि क्षमता तपासून त्यातून योग्य ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर संस्थेची अंतिम निवड करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
या बैठकीला केडीसीएचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, स्टेडियम ३६० चे सल्लागार श्रीकांत के., युवराज शहाजी राजे छत्रपती, केडीसीएचे उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव मदन शेळके, खजिनदार शीतल भोसले यांच्यासह विविध अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने सुरू असलेली ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात असून, आता अंतिम सल्लागार निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment