गोकुळवर प्रशासक नियुक्त झाल्यास नव्या दूध उत्पादकांना सभासदत्वासह मतदानाचा अधिकार द्या – राजू माने यांची मागणी

 
गोकुळवर प्रशासक नियुक्त झाल्यास नव्या दूध उत्पादकांना सभासदत्वासह मतदानाचा अधिकार द्या – राजू माने यांची मागणी






प्रशासकीय कालावधीत नवीन दूध उत्पादक शेतकऱ्यांची सभासद नोंदणी तात्काळ सुरू करण्याची मागणी


कोल्हापूर 03 सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) येथे सध्या १२ व १३ गटांमधील राजकीय वादामुळे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रखडली आहे. दोन्ही गटांतील मतभेद आणि न्यायालयीन वादामुळे संघावर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळवर प्रशासक नियुक्त झाल्यास नवीन दूध उत्पादक शेतकऱ्यांना सभासदत्व आणि आगामी निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राजू ऊर्फ सुनील श्रीपती माने यांनी केली आहे.



यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. गोकुळच्या कार्यक्षेत्रातील अनेक दूध उत्पादक शेतकरी आजही सभासदत्वापासून वंचित आहेत. दूध उत्पादकांच्या हितासाठी सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक पात्र दूध उत्पादकाला समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त झाल्यानंतर प्रशासकीय कालावधीत नवीन दूध उत्पादक शेतकऱ्यांची सभासद नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


नवीन सभासद नोंदणीसाठी प्रमुख मागण्या :


१. नवीन सभासद नोंदणी सुरू करावी : प्रशासक नियुक्त झाल्यानंतर गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रातील पात्र नवीन दूध उत्पादक शेतकऱ्यांची सभासद नोंदणी तात्काळ सुरू करावी.


२. पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा : नियमानुसार आवश्यक असलेले १८० दिवस दूध पुरवठा, भागभांडवल व इतर पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद म्हणून नोंदणी करून आगामी निवडणुकीच्या मतदार यादीत त्यांचा समावेश करावा.


३. सभासद नोंदणीत पारदर्शकता राखावी : नवीन सभासद नोंदणी करताना कोणत्याही राजकीय गटाचा किंवा व्यक्तीचा दबाव अथवा पक्षपात न करता सर्व पात्र दूध उत्पादकांना समान न्याय द्यावा.


४. न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा : पात्र दूध उत्पादकांच्या मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा.


५. सहकार कायद्याचे पालन करावे : नवीन सभासद नोंदणी आणि आगामी निवडणुकीतील मतदार यादी तयार करताना सहकार कायदा, संस्थेचे उपविधी आणि निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करावे.


गोकुळ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकारी संघ आहे. त्यामुळे संघाच्या कारभारात राजकीय समीकरणांपेक्षा दूध उत्पादकांचे हित महत्त्वाचे असले पाहिजे. नवीन सभासदांना योग्य संधी मिळाल्यास सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल आणि आगामी निवडणुकीत नव्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


प्रशासक नियुक्त झाल्यास त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन वरील मागण्यांवर सकारात्मक आणि नियमानुसार कार्यवाही करावी, असे आवाहन राजू ऊर्फ सुनील श्रीपती माने यांनी केले आहे.

Comments