करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; अन्यथा सोमवारपासून आंदोलन!
४० वाड्यांतील शेती पंचनाम्यांत दुजाभाव होत असल्याचा आरोप; पंचायत समिती सदस्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
कोल्हापूर 20 सिटी न्यूज नेटवर्क
करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० वाड्यांमधील शेतीच्या पंचनाम्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस, पावसाचे खंड आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगररांगांतील पिके पूर्णपणे वाळून गेली असून, काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही प्रशासनाकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र, करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. विशेषतः पश्चिम भागातील ४० वाड्यांमधील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना कृषी विभागाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याची तक्रार सदस्यांनी केली आहे.
पंचनामे करताना कोणताही दुजाभाव न करता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तसेच करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा सोमवारपासून आंदोलनाची पुढील दिशा ठरवून असहकाराची भूमिका घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू सूर्यवंशी, क्रांतिसिंह पाटील, सभापती साताप्पा पाटील, पंचायत समिती सदस्य विलास भोसले, आनंदा शिरोलीकर, निवास पाटील, शिवराज पाटील, सूर्यकांत दिंडे आणि माजी सरपंच सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment