आरोग्यसंपन्न, सुसंघटित आणि बलशाली हिंदू समाजनिर्मितीला प्राधान्य – डॉ . प्रवीणभाई तोगडिया

 

आरोग्यसंपन्न, सुसंघटित आणि बलशाली हिंदू समाजनिर्मितीला प्राधान्य – डॉ . प्रवीणभाई तोगडिया



देशातील प्रत्येक हनुमान मंदिरात दर शनिवारी सामुदायिक हनुमान चालीसा पठणाचा संकल्प .

कोल्हापूर 15  सिटी न्यूज नेटवर्क 

देशातील प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये दर शनिवारी रात्री नऊ वाजता सामुदायिकरीत्या हनुमान चालीसाचे पठण करण्याचा संकल्प आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया यांनी व्यक्त केला. आरोग्यसंपन्न, सुसंघटित आणि बलशाली हिंदू समाजाची निर्मिती हेच आमचे प्रमुख ध्येय असून, त्यासाठी 'आप्त हिंदूही आगे या' या घोषवाक्याच्या माध्यमातून देशभर व्यापक जनजागृती आणि संघटनात्मक कार्य उभे केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.




धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकजूट आणि आरोग्य जागृती यांचा सुरेख संगम साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. हनुमान चालीसा पठणाच्या निमित्ताने दर शनिवारी मंदिरांमध्ये एकत्र येणाऱ्या हिंदू बांधवांच्या माध्यमातून केवळ धार्मिक उपक्रम न राबवता समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह अर्थात शुगरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सामुदायिक हनुमान चालीसा पठणाबरोबरच नियमित आरोग्य तपासणी, रक्तशर्करेची तपासणी, आजारांचे वेळेत निदान आणि योग्य उपचार याबाबत जनजागृती केली जाणार आहे. धार्मिक व्यासपीठाचा उपयोग समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी व्हावा, अशी आमची भूमिका असल्याचे तोगडिया यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मोठे योगदान देणारे राज्य आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी मदत करावी. आर्थिक मदत, शेतीसाठी आवश्यक सुविधा आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदू हेल्पलाइनच्या माध्यमातून २४ तास मदतीचा हात

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या माध्यमातून २४ तास कार्यरत असणाऱ्या हिंदू हेल्पलाइनचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. संकटात सापडलेल्या हिंदू बांधवांना मदत करण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन, सहकार्य आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. युवकांना स्वावलंबी बनविणे, समाजात परस्पर सहकार्याची भावना वाढविणे आणि संघटनात्मक शक्ती निर्माण करणे या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

राम मंदिरानंतर समान नागरी कायद्याबाबत आशावाद

अयोध्येतील राम मंदिराची उभारणी हा हिंदू समाजाच्या अस्मितेचा आणि दीर्घकालीन श्रद्धेचा महत्त्वपूर्ण विषय होता. राम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्याने हिंदू समाजाच्या भावनांना न्याय मिळाला आहे. आगामी काळात समान नागरी कायद्याची अंमलबजावणीही लवकरच होईल, असा आशावाद प्रवीणभाई तोगडिया यांनी व्यक्त केला.

धार्मिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपताना आरोग्य, शिक्षण, युवकांचे सक्षमीकरण आणि समाजातील परस्पर सहकार्य या विषयांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले .

यावेळी आयोजित जाहीर सभेला विकास रेगे उद्योजक संभाजी साळुंखे, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस यांच्यासह सामाजिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रवीणभाई तोगडिया यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने हिंदू संघटन, आरोग्य जागृती आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments