नगरसेविका दिलशाद मुल्ला यांचे जात प्रमाणपत्र रद्द

 

नगरसेविका दिलशाद मुल्ला यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुणे आयुक्तांकडे अपील दाखल


कोल्हापूर 13 सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगरसेविका दिलशाद मुल्ला यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी पुणे येथील संबंधित आयुक्तांकडे अपील दाखल केले असून, न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभाग क्रमांक १४ मधून दिलशाद मुल्ला यांनी ओबीसी प्रवर्गातून मुल्लाणी जातीच्या दाखल्यावर महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील जात पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली होती. यावेळी दक्षता पथकाकडून त्यांच्या मुल्लाणी जातीसंदर्भात सकारात्मक अहवाल जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

मात्र, त्यानंतर अचानक २६ ऑक्टोबर रोजी पोस्टाद्वारे त्यांना जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा निकाल प्राप्त झाला. विशेष म्हणजे, कोणाचीही तक्रार नसताना जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे मुल्ला कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले असून, समितीच्या निर्णयाला पुणे येथे अपील दाखल करून आव्हान दिले आहे. तसेच या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे दिलशाद मुल्ला यांनी ई-सिटी न्यूजशी बोलताना सांगितले.

या प्रकरणातील अपिलाच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळासह कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Comments