दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अश्वमेध क्रीडा महोत्सव रद्द करा!
महोत्सवासाठीचा निधी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी वापरण्याची युवासेनेची मागणी
कोल्हापूर 05 सिटी न्यूज नेटवर्क
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात येणारा अश्वमेध २०२६ क्रीडा महोत्सव रद्द करावा आणि त्यासाठी प्रस्तावित असलेला निधी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी वापरावा, अशी मागणी कोल्हापूर युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागामार्फत जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२७ मध्ये अश्वमेध २०२६ क्रीडा महोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता असून, त्यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे अश्वमेध क्रीडा महोत्सव योजना बंद करून त्यासाठीचे आर्थिक सहाय्यही थांबविल्याचा दावा युवासेनेने केला आहे. असे असताना विद्यापीठाकडून या महोत्सवाच्या आयोजनासाठी सुरू असलेल्या हालचालींवर पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असताना एवढ्या मोठ्या खर्चाचा महोत्सव आयोजित करण्यामागचा नेमका उद्देश काय, असा सवाल युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तसेच या आयोजनातून कोणाला आर्थिक लाभ किंवा टक्केवारी मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
क्रीडा महोत्सवावर होणारी कोट्यवधी रुपयांची खर्चाची उधळपट्टी टाळून त्यातील निधी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी वापरावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शाहू महाराजांचे स्मारक उभारल्यास हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांतून आणि कार्यातून प्रेरणा मिळेल, अशी भूमिका युवासेनेने मांडली.
यावर कुलगुरूंनी सकारात्मक भूमिका घेत या मागणीचा नक्की विचार करू, असे आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा शिवसेना शहरप्रमुख मंजीत माने, शहर समन्वयक अक्षय घाटगे, शुभम पाटील, चिटणीस अभिषेक दाभाडे, तालुकाप्रमुख योगेश लोहार, उपशहरप्रमुख कनिष्क शिंदे, अक्षय मोरे, डॉ. चिन्मय बोकील, आदित्य हुलजी, विद्यापीठ शाखाप्रमुख राजवर्धन झाबरे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment