७५ वर्षांपासून सीमाप्रश्न प्रलंबित; महाराष्ट्रातील राजकारण्यांनी एकत्र येण्याची गरज

 

७५ वर्षांपासून सीमाप्रश्न प्रलंबित; महाराष्ट्रातील राजकारण्यांनी एकत्र येण्याची गरज!

दसरा चौकात सीमाप्रश्नासाठी आंदोलनाला सुरुवात; राजेश नाईक यांची भूमिका


कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क 

गेल्या ७५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कोल्हापुरातील दसरा चौक येथे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या प्रश्नावर सीमाभागातील नागरिक सातत्याने संघर्ष करत असले तरी अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि सीमाभागातील नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत शरद जोशी शेतकरी संघटनेचे उद्योग आघाडी प्रमुख राजेश नाईक यांनी व्यक्त केले.

गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित आहे. सीमाभागातील मराठी भाषिक नागरिक लोकशाही आणि सनदशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. विविध आंदोलने, मोर्चे आणि पाठपुरावा करूनही या प्रश्नाला अद्याप यश मिळालेले नाही.

महाराष्ट्रातील राजकारणी आणि सीमाभागातील नागरिक हा विषय अनेकदा आपल्या राजकीय सोयीनुसार हाताळत असल्याने प्रश्नाची सोडवणूक होत नसल्याचे नाईक यांनी नमूद केले. केवळ आंदोलने करून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष, नेते आणि सीमाभागातील नागरिक यांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.

सीमाप्रश्न हा केवळ राजकीय मुद्दा नसून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेचा आणि हक्कांचा प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही राजेश नाईक यांनी केले.

Comments