रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांचे जिल्हा बंद आंदोलन

 रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांचे जिल्हा बंद आंदोलन 



कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या ‘बाईकटॅक्सी’ अ‍ॅपवर बंदी घाला, रिक्षाला परवाना देतांना त्याची पडताळणी ‘ए.टी.एस्.’ या यंत्राद्वारे न करता मानवी पद्धतीने करावी, या तसेच अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील २५ सहस्र रिक्शाचालकांनी ‘रिक्षा’ बंद आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रिक्शाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन दिले. या प्रसंगी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय देवणे, रिक्शा संघटनेचे चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव यांसह अन्य उपस्थित होते.

या प्रसंगी विजय देवणे म्हणाले, ‘‘रिक्षाचे नूतनीकरण करतांना रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेतले जातात. यंत्राद्वारे रिक्षाची पडताळणी करतांना रिक्षांना परवाना मिळत नाही आणि यामुळे परत परत रक्कम भरावी लागते. अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या काही दुचाकी वाहनचालकांना पकडून दिल्यावर पोलीस त्यांच्यावर गुन्हे नोंद न करता त्यांच्याकडून दंड आकारून त्यांना सोडून देतात. तरी या संदर्भात राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.’’

रिक्षा बंद आंदोलनामुळे शहरातील सर्व रिक्षा थांब्यावर शुकशुकाट होता. या आंदोलनास प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्शांनी पाठिंबा दिल्याने आजूबाजूच्या गावांमधून कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. सायंकाळी ५ नंतर बंद मागे घेण्यात आला.


रिक्षाबंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल !

रिक्षा बंद असल्याने विशेषकरून बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांचे रेल्वेस्थानकावर, तसेच बसस्थानकावर हाल झाले. मुख्य बसस्थानकावरून शहरात अन्य ठिकाणी जाण्यासाठी शहर बससेवेविषयी अन्य कोणताच मार्ग न नसल्याने प्रवाशांना दीर्घ काळ बसस्थानकावर, तसेच विविध ठिकाणी ताटकळात बसावे लागले. याच समवेत शहरातील रिक्षा बंद असल्याने उपनगरांमधील नागरिकांना, वयस्कर लोकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

Comments