आंतरराष्ट्रीय संशोधन संघटनेच्या फेलोपदी डॉ. शिवानंद शिरकोळे यांची निवड

 आंतरराष्ट्रीय संशोधन संघटनेच्या फेलोपदी डॉ. शिवानंद शिरकोळे यांची निवड



ड्रायिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातील संशोधनाची दखल

कोल्हापूर 03 सिटी न्यूज नेटवर्क 

डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवानंद एस. शिरकोळे यांची इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन फॉर ड्रायिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आय. आर. ए. डी. एस. टी. एम ), मकाओ या आंतरराष्ट्रीय संशोधन संघटनेच्या ‘फेलो’ पदी निवड झाली आहे. ड्रायिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय संशोधन योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. 



जून २०२४ मध्ये मकाओ येथे अधिकृतपणे नोंदणी झालेल्या आय. आर. ए. डी. एस. टी. एम या संघटनेमध्ये ३० हून अधिक देशांतील २५० पेक्षा जास्त तज्ज्ञांचा सहभाग आहे. डॉ. शिरकोळे यांची २०२४ मध्ये या संघटनेच्या संस्थापक सहयोगी फेलो पदी निवड झाली होती. आता त्यांची फेलो पदी निवड करण्यात आली. ऑगस्ट २०२६ मध्ये हि निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, १५ देशांतील २४ नामवंत तज्ज्ञांनी त्यांच्या निवडीला अनुमोदन दिले.

डॉ. शिरकोळे यांनी ड्रायिंग टेक्नॉलॉजी- अॅन  इंटरनॅशनल जर्नल या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात ३० हून अधिक स्कोपस-इंडेक्स  संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. तसेच, सात विशेषांकांचे संपादन केले असून, प्रा. अरुण एस. मुजुमदार यांच्या संपादकत्वाखालील तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या संशोधन योगदानाची दखल घेऊन त्यांना चीनमधील वूहू येथे झालेल्या आय. आर. ए. डी. एस. टी. एमच्या तिसऱ्या वार्षिक परीषदेमध्ये व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते.


डॉ. शिरकोळे यांनी २००४ मध्ये डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे येथून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात केली. २०२५ मध्ये चीनमधील चांगझोऊ येथे आयोजित चायना ड्रायिंग कॉन्फरन्समध्ये त्यांना ‘आउटस्टँडिंग यंग सायंटिस्ट फॉर ड्रायिंग रिसर्च’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, फ्रीझिंग अँड क्रिस्टलायझेशन प्रोसेसेस या संशोधन क्षेत्रातील जागतिक क्रमवारीत पहिल्या १,००० संशोधकांमध्ये त्यांनी १९५ वे स्थान मिळविले आहे.


या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल डॉ. शिरकोळे यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्र-कुलपती ऋतुराज एस. पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता, कुलसचिव प्रा. जयेंद्र ए. खोत आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुजित सरनाईक, तसेच सर्व अधिष्ठाता, संचालक आणि विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले.

Comments