सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरूच
सलग दुसऱ्या दिवशी सामूहिक रजा; न्यायालयीन कामकाजावर परिणाम
कोल्हापूर 18 सिटी न्यूज नेटवर्क
सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत सामूहिक रजा आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
न्यायालयीन कर्मचारी महासंघ, स्टेनोग्राफर असोसिएशन, बेलीफ कर्मचारी महासंघ आणि गट ड कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबत उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी निर्देश दिले होते. मात्र, राज्य शासनाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
या आंदोलनात महेश पाटील, विनोद भिलारे ,शीला काशीद, अन्वर पठाण, बाबा तांबे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आता न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment