जंगलाचा मुकुटमणी: पांढरा कुडा

            जंगलाचा मुकुटमणी: पांढरा कुडा



   परवा सहज काही कारणाने जंगलाचा नुसता स्पर्श झाला नी काय आश्चर्य? जागोजागी पांढऱ्या  शुभ्र फुलांच्या झुपक्यांनी जणू निसर्गाच्या सुंदरतेवर मुकुटमणीच घातला आहे असा भास झाला पावलागणिक ही झुडपे सौंदर्याचा हा मुकुटमणी घालून जागोजाग या विरळ जंगलात उभी होती. पाडाला आलेली करवंदे खायची सोडून मी या फुलांचा दरवळणारा घमघमाट नाकातून आत खोलवर कितीतरी वेळ घेत राहीलो. सारा आसमंत या शुभ्र फुलांच्या वासाने दरवळून गेला होता.एक प्रकारचे चैतन्य जंगलात भरून राहीले होते. पक्षीजीवन तर या सुवासाने प्रफुल्लीत झाले असावे. ईश्वराची ही अगाध लिला मी कितीतरी वेळ अनुभवत होतो.या फुलांच्या साम्राज्यातून पाय निघता निघत नव्हाता. गेल्या वेळी याच दिवसात संध्याकाळी अंधार पडताना अंधुकशा प्रकाशात तर या पांढऱ्या कुड्याच्या या फूलांचा हा मुकुटमणी संपुर्ण जंगल परिसरात उठून दिसत होता. अशा सांजवेळी या फूलांचे टिपलेली छायाचित्रे कित्येक दिवस मी उराशी बाळगून होतो.ही फूले पाहातानाचा होणाऱ्या आनंदाची कशाशी  तुलना करता येणार नाही.
    काही काही वेळा जंगलाच्या विशिष्ट अशा भागात विशिष्ट अशा वनस्पतीचे साम्राज्य असते. त्या वनस्पतीच्या नावावरूनही त्या भागाला ओळखले जाते. जसे की एखाद्या ठराविक भागात पेंढरी वनस्पती बहुसंख्येने असते म्हणून त्या जंगलाच्या भागाला पेंढरीचा माळ असे नांव पडले.परवा ही जागोजागी फूले पाहाताना या रानाला कुड्याचे रान म्हणून ओळखावे इतकी ही वनस्पती आढळत होती.एरवी अनेकांना जंगलात कोणत्या वनस्पती किती संख्येने आणि का आहेत याची उकल होत नाही मात्र नेहमी जंगलाचा सहवास करणाऱ्याला ते निश्चीत जाणवते. काही वेळा फूले आल्यानंतरच वनस्पतींची संख्या कळून येते.आज माझे भाग्य होते.नेमका फुलोरा येण्याच्या सर्वोच्च क्षणी मी या कुड्याच्या वनात उभा होतो. सृष्टीचे अगाध सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवत होतो.
   या नवस्पतीच्या या औषधी गुणधर्माबध्दल बोलायचे तर खूप बोलता येईल. आयुर्वेदातील मानदंड असलेली वनस्पती.हिच्या नानाविध उपयोगाने ही जंगलात प्रसिध्द आहे.हिला जंगलाची राणी म्हटल्यास वावगे ठरू नये.
    कुड्याच्या पानाच्या बिड्या तयार केल्या जातात.हा बहुविध उपयोगाचा कुडा अतिसार, अमांश, मुळव्याधी, रक्तस्त्राव, अग्नीमांद्य अशा अनेक विकारात उपयोगी ठरतो.हे झुडूप साधारणत: १५ फूट उंच वाढते.याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग करतात.कुटजारिष्ट हे प्रसिध्द औषध या कुड्यापासूनच बनवले जाते.यासाठी याची साल उपयोगात आणली जाते. अधिक माहिती घेतली असता असे समजते की या पांढऱ्या कुड्या ला इंद्रजव नावानेही ओळखले जाते.इंग्रजीमध्ये Holarrhena pubascens म्हणून ओळखले जाते.याच्या या फुलांची भाजीही केली जाते.आपण या ज्ञानाला आता पारखे झालो आहोत. वाडवडिलांनी याची भाजी खाल्ली ते बलवान झाले.याचा दुसरा प्रकार म्हणजे काळा कुडा ही असतो.पण अधिक खोलात जायला नको. सृष्टीच्या या अगाध लिलेला मी मनोमन हात जोडले.पुंन्हा एकदा दिर्घ श्वास घेवून या फूलांचा मंद सुवास छातीच्या भात्यात साठवून ठेवला. नाकाची रंध्रे अधिक उत्तेजीत झाली.मन प्रसन्न झाले आणि कामाच्या ओढीने मी येथून इच्छा नसतानाही बाहेर पडलो.
*   पत्रकार सुभाष माने
* संपादक, साप्ताहिक टाईम्स ऑफ भुदरगड, गारगोटी.
मो.७७७००५७५४२

Comments