कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पुरस्कार जाहीर - शनिवारी होणार वितरण
कोल्हापूर 23 सिटी न्यूज नेटवर्क
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी, दुपारी ४.३० वाजता, दिगंबर जैन बोर्डिंग, दसरा चौक येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री. जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे- अध्यक्ष, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन हे उपस्थित राहणार असून ते “व्यापार – उद्योगावरील आव्हाने – संधी – संघटनेचे महत्व” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्रीमती जयश्री जाधव- आमदार, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, श्री. ललित गांधी- अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई व श्री. धैर्यशील पाटील- अध्यक्ष, दि ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन व दि महाराष्ट्र कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात विविध मान्यवराना गौरविले जाणार आहे .
सन २०२१-२०२२ या वर्षाकरीता पुरस्कार निवड समितीने निवडलेले उद्योग व व्यापार क्षेत्रातील नामवंत व त्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार असे -
कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार - श्री. व्ही. एन. देशपांडे (साउंड कास्टींग्ज प्रा. लि.)
श्री. व्ही. एन. देशपांडे यांनी अनेक कंपन्यांमध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर काम केले. नंतर केवळ रु. ९०,००० इतक्या अल्प भांडवलावर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज साउंड कास्टींगचा एक प्रथितयश उद्योग म्हणून लौकिक आहे. विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या युनिटस् ची उलाढाल १००० कोटीकडे झेप घेत आहे. कुरुंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जन्मगावाशी नाळ जोडली आहे. सामाजिक कार्यात ते सक्रीय असतात. २०१७ ते २०२१ पर्यंत ते रोटरीच्या समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष होते .
कै. परशराम उर्फ बापुसाहेब जाधव उद्योग पुरस्कार - श्री. चंद्रशेखर शंकर डोली (मयुरा स्टील प्रा. लि.)
अत्यंत हलाखीच्या अशा एका शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उद्योग निर्मितीचे स्वप्न पाहिले. 1980 साली त्यांनी “अलॉय स्टील” या नावाने उद्योगाचे रोपटे लावले. अथक परिश्रम, गुणवत्ता पूर्ण सेवा यामुळे उद्योगाचा विस्तार सुरू झाला आणि “मयुरा समूहाचे” नाव सर्वमान्य झाले. अर्थ मुव्हींग मशिनरी मधील त्यांच्या कौशल्याची दखल देशभरातील मातब्बर उद्योगांनी घेतली. एल अँड टी, टाटा हिताची, व्होल्वो, महिंद्रा व जेसीबी यासारख्या जगन्मान्य कंपन्या त्यांच्या ग्राहक बनल्या.
कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार - श्री. नानासाहेब उर्फ विश्वनाथ शिवपाद नष्टे (मे. विरुपाक्ष लिंगाप्पा नष्टे)
नानासाहेब नष्टे यांच्या आजोबांनी कोल्हापूर महानगरपालिकेजवळ “विरुपाक्ष लिंगाप्पा नष्टे” ही शतकोत्तर रौप्यमहोत्सवी फर्म उभी केली. या फर्मचा विस्तार व भरभराट करण्यामध्ये नानासाहेबांचा मोलाचा वाटा आहे. व्यापारातील सचोटी, प्रामाणिकपणा, विश्वास व व्यवहारातील पारदर्शकता याचा अवलंब करुन त्यांनी मोठे नांव कमावले आहे. त्यांच्या व्यवसायातील पिढीला एक आदर्श व्यापारी पिढी म्हणून पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात ख्याती होती. श्री. वीरशैव बँकेमध्ये १९८२ पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. या बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष तथा ३ वेळा बँकेच्या अध्यक्षपद ही भुषविले आहे. कोल्हापूरातील महालक्ष्मी भक्त मंडळ येथे १९७५ पासून संचालक व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे.
कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उद्योग पुरस्कार
१) श्री. रविंद्र रायगोंडा पाटील (सुशिल फार्मा एल. एल. पी. इचलकरंजी)
श्री. रविंद्र पाटील यांनी औषध विक्री सारख्या जीवन रक्षक शास्त्राचे शिक्षण घेऊन इचलकरंजी ही कर्मभूमी निवडली. औषध विक्री व वितरण क्षेत्रात किरकोळ व घाऊक सेवा देत व्यवसायाची व्याप्ती इचलकरंजी शहराच्या सीमा पार करून पुढे कोकणापासून पुण्यापर्यंत परीघ विस्तारला. व्यवसायातील चढ-उतार आणि स्पर्धात्मक स्थितीला समर्थपणे सामोरे जात असताना व्यवसाय वाढीची आणखी विशाल स्वप्ने त्यांना साद घालत होती. त्यामधूनच अकरा सह व्यावसायिकांना एकत्र करून सुशील फार्मा एलएलपी ची मुहूर्तमेढ रोवली. सुशील फार्मा एलएलपी या अभिनव उपक्रमाची उभारणी करताना अनंत अडचणी आल्या. अथक परिश्रम, दूरदृष्टी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर, व्यवसायातील पारदर्शकता, सर्व सहभागीदारांच्या क्षमतेचा आणि कौशल्याचा पर्याप्त वापर, आर्थिक शिस्त ही त्यांच्या कार्यपद्धतीची यशसूत्रे आहेत.
२) सौ. अश्विनी विपुल दानिगोंड (मनोरमा इन्फोसोलुशन्स प्रा. लि.)
सौ. अश्विनी दानिगोंड या हेल्थकेअर आय.टी. मधील नवसंकल्पनांवर काम करणाऱ्या उद्योजिका आहेत. त्या मनोरमा इन्फोसोलुशन्सच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीमध्ये सध्या ३०० टेक्नोक्रॅटस् वैद्यकीय डॉक्टरांसह कार्यरत आहेत. आय.टी. व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या पहिल्या पिढीतील त्या महिला उद्योजक आहेत. त्यांनी अनेक आव्हानात्मक जागतिक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांच्या कंपनीने ११ आंतरराष्ट्रीय देशामध्ये मोठे आरोग्य सेवा प्रकल्प वितरीत केले आहेत. त्यामुळे ग्राहकांशी चिरस्थायी संबंध निर्माण झाले आहेत. त्यांच्या या मोहीमेमुळे आरोग्य सेवा संस्था सक्षम झाल्या आहेत. त्यांनी सुरु केलेल्या कंपनीने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आफ्रिका आणि उर्वरित आशियामध्ये सुमारे २० आरोग्य सेवा पुरवठादारांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. विविध शिखर परिषदांना तज्ज्ञ वक्ता म्हणून त्यांना निमंत्रीत केले आहे. या पुरस्कार घोषणे वेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर व राजू पाटील, खजिनदार हरिभाई पटेल, संचालक अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पटील, अनिल धडाम, संभाजीराव पोवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment