डॉ सुप्रिया आवारे लिखित "काळोखाचा राजपुत्र" आणि पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी लिखित काव्यसंग्रह "सप्तरंग कवितेचे" या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न

डॉ सुप्रिया आवारे लिखित "काळोखाचा राजपुत्र" आणि पोलीस  निरीक्षक निसर्ग ओतारी लिखित काव्यसंग्रह "सप्तरंग कवितेचे" या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न 


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

डॉ सुप्रिया आवारे लिखित "काळोखाचा राजपुत्र" आणि पोलीस  निरीक्षक निसर्ग ओतारी लिखित काव्यसंग्रह "सप्तरंग कवितेचे" या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज महावीर  महाविद्यालय येथे संपन्न झाला. 

महावीर महाविद्यालय कोल्हापूर- माजी विद्यार्थी संघ आणि मराठी वाडमय मंडळ बी.ए.बी.एड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन  सोहळा  आज  "ॲम्पी थिएटर" महावीर महाविद्यालय-कोल्हापूर येथे हा मोठ्या उत्साहात  पार पडला.


पुस्तकांचा परिचय 

डॉ सुप्रिया आवारे लिखित काळोखाचा राजपुत्र आणि पोलीस  निरीक्षक निसर्ग ओतारी लिखित सप्तरंग कवितेचे ही दोन्ही पुस्तके खरोखर वाचनीय आहेत.

सदर काव्यसंग्रहास कवितेचे सप्तरंग हे नाव देण्याचे कारण हे आहे की, पुस्तकामध्ये वेगवेगळ्या विषयावर कविता लिहिलेल्या आहेत. काही बाल कविता आहेत, काही प्रेम कविता आहेत, काही भक्तिपर कविता आहेत, काही देशभक्तीपर कविता आहेत, काही हिंदी भाषेत सुद्धा कविता लिहिल्या आहेत परंतु जास्त कविता ह्या सामाजिक विषयावर व प्रश्नावर लिहिलेल्या आहेत, पुस्तक लिहिण्याचा उद्देश समाजातील समस्यांवर प्रकाश टाकणे व त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे, समाजात वावरत असताना अशा पीडित लोकांच्या समस्यांची जाणीव लोकांना व्हावी व त्यांनी अशा विषयाबाबत संवेदनशील राहावे, या पुस्तकातून एका व्यक्तीला जरी समस्यांबाबत त्याची जाणीव झाली तरी सदर पुस्तकाचा उद्देश साध्य झाला असे मी म्हणेन, मी कविता लिहिताना साध्या सोप्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून लहान मुलांनाही कविता वाचल्यानंतर समजावी व त्यांनीही या कवितांचा रस घ्यावा या उद्देशाने. २ ते ३ अपवाद सोडता बाकी सर्व कविता मी नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत या कालावधीत लिहलेल्या आहेत, सदर कविता लिहिण्यासाठी मला पोलीस खात्यातील खडतर कर्तव्य सांभाळून त्यातून वेळ काढून लिहिताना तारेवरची कसरत करावी लागली, खडतर कर्तव्य, गुन्ह्याचे उकल, गुन्ह्याच्या तपासामध्ये प्रचंड बुध्दी खर्च होवून जी काही बौद्धिक व मानसिक उर्जा शिल्लक राहिली त्यातून हा काव्यसंग्रह लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, वाचक वर्ग माझी मेहनत नक्कीच समजून घेतील अशी आशा आहे.


वाचकांना हा काव्यसंग्रह वाचताना काही सामाजिक प्रश्नांच्या धगधगीत वास्तव्याचा देखील अनुभव येईल व नक्कीच त्यांना सामाजिक समस्यांची जाणीव होईल, तसेच शिवबाचा यल्गार पोवाडा, बालकविता, प्रेमकविता, देशभक्ती, देवभक्ती कविता वाचताना नक्कीच आनंद होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.


काळोखाचा राजपुत्र (वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेचा आदिबंधात्मक दृष्टीने अभ्यास) हा एक समीक्षा ग्रंथ आहे. आदिबंध ही मानसशास्त्रीय संकल्पना साहित्यामध्ये उपयोजित करून पाहिले जाते. तेव्हा त्याच दृष्टीने वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतील आदिबंध शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. वसंत आबाजी डहाके हे 1960 नंतरच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा अतिशय नेमकेपणाने आणि सजगपणाने वेध घेतात. त्यामुळे ही कविता मराठी साहित्य क्षेत्रात खूप महत्त्वाची आहे. तिचा अभ्यास होणे गरजेचे होते. 1960 नंतरच्या परिस्थितीतील नकारात्मकतेसाठी डहाके काळोख, अंधार या प्रतिमा पुन्हा पुन्हा वापरतात. राजपुत्र ही त्यांनी उपहासात्मक वापरलेली संकल्पना आहे. म्हणूनच 'काळोखाचा राजपुत्र'  हे शीर्षक अतिशय नेमकेपणाने येथे वापरलेले आहे. समीक्षा हा प्रांत साहित्यकृतीला आणि साहित्य प्रवाहाला गतिमान बनवतो. त्यादृष्टीने या ग्रंथातील अदिबंधांची मांडणी ही सुद्धा वसंत आबाजी डहाके व 1960 नंतरच्या काळाचा वेध घेतेच परंतु आदिबंधात्मक समीक्षेला देखील एक नवा आयाम प्राप्त करून देते. हीच या ग्रंथलेखनामागची देखील भूमिका आहे.





Comments