महावितरण कर्मचाऱ्यांची विद्युत सुरक्षितता कार्यशाळा संपन्न
*शून्य अपघात करिता कर्मचाऱ्यांनी घेतली सुरक्षेची शपथ*
कोल्हापूर, दि.१८ सिटी न्यूज नेटवर्क
वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा देताना कर्मचाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करत सुरक्षा साधनांचा वापर करावा, याकरीता कर्मचाऱ्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने शहर विभागातील बाह्यस्रोत कर्मचा-यांसाठी विद्युत सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी ‘शून्य अपघात’ संकल्पना राबविण्याच्याकरीता सुरक्षीततेची शपथ घेतली.
विद्युत भवन या कोल्हापूर परिमंडलाच्या कार्यालयात आयोजित कार्यशाळेचा सुमारे १५० कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. विद्युत सुरक्षितेबाबत घ्यावयाची दक्षता या विषयावर बोलताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वायदंडे म्हणाले, वीज वाहिनीवर काम करताना सबंधित उपकेंद्रातून रितसर परवानगी घ्यावी. अर्थिंग रॉडचा वापर करत वीज वाहिनी डिस्चार्ज केल्यानंतरच वीज वाहिनीवर काम करावे. रबरी हातमोजे यांचा आवर्जून वापर करावा. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय तिरमारे व नितीन धुमाळ यांनी यापूर्वी घडलेल्या अपघातांबाबत सविस्तर कारणमिमांसा करत अशा चुका भविष्यात टाळण्याचे आवाहन सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना केले.
यावेळी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पगार खाते काढल्याने मिळणारे फायदे या विषयावर बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर यांच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांनी मानले. सदरची विद्युत सुरक्षितता कार्यशाळा ही प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सांगली यांचे समन्वयाने लघु प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांनी आयोजित केली होती.
Comments
Post a Comment